नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल व डिझेलचे दर वाढत असल्याने या दरवाढीचा निषेध आम आदमी पक्षाच्यावतीने सोमवारी (दि. १) केंद्र सरकार संसदेत बजेट सादर करत असताना दुचाकी वाहनांना धक्का देत आंदोलन करुन करण्यात आला. सरकारविरोधात निषेध नोंदविण्यासाठी शहरात आम आदमी पक्षाकडून दुचाकी वाहनांना धक्का देत आंदोलन करण्यात आले.
आम आदमी पक्षातर्फे पंचवटी कारंजा परिसरात दुचाकींना धक्का मारत आंदोलन करतानाच केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. त्यातून कुठेतरी सर्वसामान्य माणूस सावरत नाही तोच इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. आजमितीस पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले असून, शहरात पेट्रोलचे दर ९४ रुपये प्रतिलीटरपर्यंत पोहोचले आहेत. लवकरच हे दर शंभरी गाठण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कच्च्या तेलाचे भाव आटोक्यात असताना केंद्र शासनाच्या भरमसाठ करामुळे इंधनाचे दर वाढले असून, याला केंद्र शासनच जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्यावतीने पंचवटी कारंजा ते मालेगाव स्टँड येथील पेट्रोल पंपापर्यंत दुचाकींना धक्का मार आंदोलन करून निषेध व्यक्त करुन करण्यात आला. यावेळी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात यावे, केंद्र व राज्य शासनाचा टॅक्स कमी करून सामान्य जनतेची भाववाढीपासून सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात आपचे जिल्हाध्यक्ष योगेश कापसे, शहराध्यक्ष गिरीश उगले, ॲड. प्रभाकर वायचळे, राजेंद्र हिंगमिरे, बंडू महानुभाव, अनिल फोकने आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
(01पीएचएफबी61/62)