संजय पाठक नाशिककेंद्र शासनाच्या वतीने छोट्या किरकोळ विक्रेत्यांपासून मध्यम नवउद्योजकांसाठी राबविण्यात येत असलेल्या मुद्रा योजनेने मोठा आधार दिला असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातच ८३ हजार उद्योजकांना पावणे तीनशे कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. अर्थात, नोटाबंदीचा मोठा परिणाम सध्या जाणवत असून, त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत मुद्राचे वितरणच झाले नसल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे बॅँकांकडून नकारघंटा वाजवली जात असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्या तरी त्या ऐकण्यासाठी मात्र जिल्हा प्रशासनाने यंत्रणाच तयार केलेली नाही.मुद्रा योजनेअंतर्गत शिशू या कर्ज पुरवठ्यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत वित्तपुरवठा केला जातो. त्यामुळे सूक्ष्म व छोटे गृहोद्योग, कुटीरोद्योग, भाजीवाले, पानाचा ठेला असणाऱ्यांसाठी आणि अगदी पापड लाटणाऱ्या आणि ब्युटीपार्लर सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठीही कर्ज पुरवठा होतो. किशोर योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांचा वित्तपुरवठा केला जातो. त्यात सेवा विक्री उद्योगांचा समावेश असून, त्यात एसटीडी पीसीओपासून हॉटेल, किराणा, कपडे विक्रीच्या व्यवसायापर्यंत अनेकांचा समावेश होतो. तर तरुण वित्तपुरवठा योजनेत दहा लाख रुपयांपर्यंतचा वित्तपुरवठा होतो आणि त्यात मध्यम स्वरूपाच्या उद्योग आणि व्यवसायाला वित्तपुरवठा केला जातो. गेल्या सप्टेंबर महिन्यापर्यंतचा आढावा घेतला तर राज्यात ३५ लाख ३५ हजार ०६५ इतक्या नव्या खातेदारांनी बॅँकेत मुद्रा योजनेसाठी खाते उघडले आहेत. देशात मुद्रा योजनेअंतर्गत वित्तपुरवठा करण्यात तामिळनाडू प्रथम क्रमांकावर असून त्याखालोखाल कर्नाटक दुसऱ्या तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. नाशिक जिल्ह्यातही ८३ हजार विक्रेते आणि व्यावसायिकांना अर्थपुरवठा करण्यात आला आहे.
८४ हजार व्यावसायिकांच्या हाती पावणे तीनशे कोटींच्या मुद्रा!
By admin | Updated: January 13, 2017 01:14 IST