नाशिक शहर व परिसरात बेशिस्त वाहतुकीचा कळस दररोज नजरेस पडतो. दुचाकीचालक, चारचाकीचालक सर्रासपणे लहान-मोठ्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. एक जागरुक नाशिककर म्हणून रस्त्यांवरुन वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांपेक्षा वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. रस्ता सुरक्षेच्या हेतूने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये स्थापन करण्यात आलेल्या समितीने (सीओआरएस) याबाबत सूचना केली. या सूचना विचारात घेता राज्य शासनाने मोटार वाहन कायदा, १९८८ कलम-१९ अंतर्गत व केंद्रीय मोटार वाहन नियम,१९८९ च्या नियम-२१ नुसार वाहतूक नियमांच्या सहा गुन्ह्यांसाठी आरटीओने दिलेला वाहन परवाना थेट ९० दिवसांकरिता रद्द करण्यात येत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी सांगितले.
यामुळे आता यापुढे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बेदरकारपणे वाहने दामटविणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, सिग्नलचे पालन न करणे, मालवाहू वाहनातून सर्रासपणे प्रवाशांची वाहतूक करणे, मद्य प्राशन करुन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे असे कृत्य करताना कोणी वाहनचालक आढळून आल्यास थेट त्याचा वाहन परवाना यापुढे रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
--इन्फो--
...तर परवाना कायमस्वरुपी निलंबित
वरील सहा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर संबंधित पोलीस ठाणे, वाहतूक शाखा अथवा आरटीओ अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या परवाना निलंबित करण्याच्या प्रस्तावाची चौकशी करत पहिल्यांदा गुन्ह्यात आढळल्यास ९० दिवसांकरिता परवाना रद्द करण्यात येतो; मात्र त्यानंतरही अशा प्रकारे गुन्ह्याची पुनरावृत्ती संबंधित वाहन चालकांकडून झाल्यास त्याचा परवाना कायमस्वरुपी निलंबित केला जाऊ शकतो.
--इन्फो--(पॉइंटर्स)
१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत ६९८ वाहन चालकांचे परवाने रद्द
१एप्रिल २०२० ते ३१ डिसें.२०२० या कालावधीत ११८ वाहनचालकांचे परवाने रद्द
---
फोटो आर वर १२आरटीओ/ १२आरटीओ१/ १२ड्रिंक