नाशिक : उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, सहायक विक्रीकर आयुक्त, मुख्य अधिकारी, सहायक कार्यकारी अधिकारी, तहसीलदार यांसारख्या विविध पदांच्या १०९ जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यातील ३७ मुख्य केंद्रांवर राज्यसेवा पूर्वपरीक्षा घेण्यात आली. नाशिकमध्ये एकूण २९ उपकेंद्रांवर ८ हजार ८९४ विद्यार्थ्यांनी रविवारी ही परीक्षा दिली. गेल्या वर्षी विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यानंतर विविध पदांसाठीच्या तब्बल १०९ जागांसाठी सदर राज्यसेवा पूर्वपरीक्षा रविवारी घेण्यात आली. नाशिकमधील २९ केंद्रांवर घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी एकूण ११ हजार ७६२ पैकी ८ हजार ८९४ उमेदवारांनी हजेरी लावली. सामान्य अध्ययन या विषयाचे प्रत्येकी दोनशे गुणांचे दोन पेपर सकाळ व दुपार सत्रात घेण्यात आले. एकूण ४०० गुणांची ही परीक्षा झाली. परीक्षा कामासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक हजार १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.शहरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. यासाठी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. नाशिकमधील २९ केंद्रांवर झालेल्या परीक्षेत सुमारे तीन हजार पेक्षा अधिक विद्यार्थी गैरहजर राहिले. शहरातील या सर्व परीक्षा केंद्रांवर शांततेत परीक्षा पार पडली. दरम्यान, परीक्षेसाठी काठिण्यपातळी वाढविण्यात आल्याने उमेदवारांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. मागील वर्षापासून परीक्षेची काठिण्यपातळी वाढविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
८ हजार ८९४ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
By admin | Updated: April 10, 2016 23:53 IST