नाशिक : कार्यालयीन वेळेत न पोहोचताच टंगळमंगळ करणाऱ्या ४९२ लेटलतिफांना महापालिका आयुक्तांनी दणका दिला आहे. पालिकेच्या सर्व विभागांत साडेदहा वाजताच हजेरी मस्टर ताब्यात घेऊन येणाऱ्या साऱ्यांचीच हजेरी घेण्यात आली आणि वार्षिक वेतनवाढ का रोखू नये अशा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.महापालिकेच्या मुख्यालयासह सर्वच कार्यालयात अनागोंदी आहे. कार्यालयीन वेळ सकाळी दहा वाजेची असताना कर्मचारी वेळेवर येत नाही. काही कर्मचारी साडेदहा वाजेनंतर उगवतात, त्यांच्याकडे कार्यालयीन आणि क्षेत्रीय कामाची जबाबदारी आहे, असे कर्मचारी तरी पालिकेत न येता क्षेत्रीय कामासाठी गेल्याचे सांगतात आणि असे कर्मचारी कार्यालयातही नाही आणि कार्यस्थळावरही नाही अशी अवस्था असते. मुख्यालयात अशी अवस्था लक्षात आल्यानंतर आता पालिकेत थंबिंग मशीन लावण्यात आले आहे. तरीही मुख्यालय आणि अन्य विभागीय कार्यालय आणि सफाई कामगारांचे हजेरी शेडमध्ये येथे अनागोंदी कारभार आहे. गेल्याच आठवड्यात सिडको कार्यालयातील लेटलतिफांचे स्ंिटग आपरेशन केले होते.दरम्यान, शनिवारी सकाळी आयुक्तांनी कार्यालयात आल्यानंतर पालिकेचे विजय पगार, हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम, दत्तात्रेय गोतिसे असे चार उपआयुक्त तसेच सहायक आयुक्त नितीन नेर, वसुधा कुरणावळ आणि चेतना केरुरे यांना पालिकेचे मुख्यालय, सहा विभागीय कार्यालय आणि काही हजेरी शेड येथे पाठवून तेथील हजेरी मस्टर जप्त करण्यास सांगितले. त्यानुसार या सर्वांनी विभागीय कार्यालयात जाऊन सकाळी साडेदहा वाजता सर्व विभागीय कार्यालयांमध्ये संबंधितांना पाठविले. त्यांनी तेथे पोहोचल्यानंतर सकाळी साडेदहा वाजता या कार्यालयांमधील हजेरी मस्टर जप्त करून घेतले. त्यानंतर आलेल्या कर्मचाऱ्यांची वेगळी नोंद करण्यात आली. त्यानुसार एकूण ४९२ लेटलतिफ आढळले. यात आठ सफाई कामगार आहेत. या सर्वांना आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या आदेशानुसार नोटिसा बजावण्यात आल्या असून, वार्षिक वेतनावाढ का रोखू नये अशी विचारणा करण्यात आली आहे. या प्रकारामुळे लेटलतिफांचे धाबे दणाणले असून, सोमवारपासून कर्मचारी वेळेवर येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
४९२ लेटलतिफांना महापालिका आयुक्तांनी दणका दिला
By admin | Updated: November 16, 2014 01:26 IST