येवला : काही गावांतून एकापेक्षा अधिक नावाचे ठराव आल्याने, शिवाय पाणी योजनेचे पदसिद्ध सदस्य सरपंच ठरत असल्याने जिल्हा परिषद कार्यालयाच्या सभासद यादी मंजुरीनंतरच ३८गाव पाणीपुरवठा योजनेच्या सदस्यांची बैठक आयोजित करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर व उपाध्यक्ष मोहन शेलार यांनी केली आहे. ३८ गाव पाणी योजना सदस्य यादीबाबत हरकत घेताना राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरसूल, धानोरे, धूळगाव, एरंडगाव खु., देवठाण, बाभूळगाव, अंगणगाव, अनकुटे, विसापूर, कातरणी, रेंडाळे या गावांतून एकापेक्षा जास्त नावाचे ठराव आलेले असल्याने विषय वादग्रस्त आहे. अंगणगाव व धामोडे या गावात ग्रामसभा झालेल्या नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल केल्या आहेत. १२ आॅगस्ट २००९च्या ग्रामीण पाणीपुरवठा शासननिर्णयाप्रमाणे गावाचे ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे पदसिद्ध अध्यक्ष सरपंच असतात. सरपंचांनी कामास नकार दिल्यास इतर व्यक्तीची निवड होऊ शकते. मात्र अनकुटे, धूळगाव, कातरणी या गावांतील सरपंचांचे पत्र प्राप्त असतानादेखील अन्य व्यक्तीच्या नावाचे ठराव आलेले आहेत. यामुळे ३८ गावाच्या ठरावाद्वारे नावे निश्चित करावे, नावाची जिल्हा परिषद कार्यालयाकडून मंजुरी घ्यावी व मंजुरी मिळाल्यानंतर बैठक घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर व उपाध्यक्ष मोहन शेलार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अनधिकृत ग्रामसभा व मासिक ठरावांची चौकशी करण्याची मागणी येथील राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.तालुक्यात ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरळीत सुरू आहे. पंचायत समिती कार्यालयाकडून ३८ गावातील समिती सदस्यांचे ग्रामपंचायतीकडून ठराव मागविण्यात आले होते. ठराव झाल्यानंतर या समितीची मुदत ५ वर्षांची असते, असे असताना तालुक्यातील नगरसूल, धानोरे, एरंडगाव खु., देवठाण, बाभूळगाव, अंगणगाव, अनकुटे, विसापूर, कातरणी, रेंडाळे या गावांतील ग्रामसेवकांनी परस्पर मर्जीतल्या लोकांच्या नावे ठराव लिहून दिला असल्याने या ग्रामसेवकांची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर मोहन शेलार, संजय बनकर, मकरंद सोनवणे, वसंत पवार, भाऊसाहेब कळसकर, जावेद खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
३८गाव योजनेचे पाणी ‘पेटण्याची’ चिन्हे
By admin | Updated: August 2, 2016 01:21 IST