नाशिक : वाहन नोंदणी, आकर्षक क्रमांक तसेच विविध प्रकारच्या कराद्वारे प्रादेशिक परिवहन विभागास (आरटीओ) दरवर्षी मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. नोटाबंदीमुळे वाहन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना फटका बसूनही नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाचा महसूल २०१६-१७ मध्ये मिळालेला महसूल हा गतवर्षी मिळालेल्या महसुलापेक्षा १४़९० टक्के अधिक वसूल केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे़ नाशिक परिवहन विभागात मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचाही समावेश आहे़ वाहन नोंदणी, चालक परवाने, आकर्षक वाहन क्रमांक, दंड, विविध कर यातून आरटीओला महसूल मिळतो. आरटीओ कार्यालयास मिळणाऱ्या महसुलात दरवर्षी सातत्याने वाढ होत आहे़ २०१५-१६ या आर्थिक वर्षात नाशिक कार्यालयास एकूण २१२ कोटी ७९ लाख ४ हजार रुपयांचा महसूल मिळाला होता़ यामध्ये १४़९० टक्क्यांची वाढ होऊन २०१६-१७ या आर्थिक वर्षात २४४ कोटी ५० लाख ५० हजार रुपयांचा महसूल मिळाला असून गतवर्षीपेक्षा यावेळी ३३ कोटींची महसुलात भर पडली आहे़ आरटीओ कार्यालयात गतवर्षी १ लाख ९ हजार ८०२ वाहनांची नोंदणी करण्यात आली होती, तर यावर्षी १ लाख १ हजार ४३७ वाहनांची नोंदणी करण्यात आली असून, त्यामध्ये ७़६२ टक्क्यांची घट झाली आहे़ आरटीओ भरारी पथकांच्या यावर्षीच्या कामगिरीमुळे होणाऱ्या महसुलात तूट आली आहे़ तर आकर्षक क्रमांकांनी महसुलात चांगलाच हातभार लावला असून, गतवर्षीच्या तुलनेत २३़७४ टक्क्यांनी महसुलात वाढ झाली आहे़ दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बीएसथ्री वाहन विक्रीवर ३१ मार्चनंतर घातलेल्या बंदीमुळे नागरिकांनी पूर्वीच ही वाहने खरेदी केल्यामुळेही महसुलात चांगलीच भर पडली आहे़ (प्रतिनिधी)
आरटीओच्या महसुलात ३३ कोटींची वाढ
By admin | Updated: April 1, 2017 02:04 IST