नाशिक : महापालिकेच्या ४१८ अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना सकस आहार पुरविण्याचा ठेका ३१ महिला बचत गटांना देण्यात आला असून, त्यांची क्षमता तपासून त्यांना काम देण्याचे आदेश सोमवारी अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी काढले. महापालिकेच्या अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना सकस आहार पुरविला जातो. सदर योजनेच्या ठेक्याची मुदत संपल्याने महापालिकेने इ-निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार, निविदाप्रक्रियेत ४४ महिला बचत गटांनी सहभाग नोंदविला होता. त्यातील ३१ बचत गट पात्र ठरले, तर १३ अपात्र ठरविण्यात आले. ज्या बचत गटांना ‘अ’ दर्जा आहे, चांगला अनुभव आहे आणि त्यांच्याविरुद्ध तक्रारी नाहीत अशा बचत गटांचा विचार सकस आहाराच्या ठेक्याबाबत करण्यात आला. सदर पात्र महिला बचत गटांना सोमवारी महापालिकेत बोलाविण्यात येऊन त्यांच्या क्षमतेविषयी चाचपणी करण्यात आली. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर संबंधित महिला बचत गटांना कार्यादेश काढण्यात येतील. सदर महिला बचत गटांनी अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजेपर्यंतच आहार पुरवायचा असून, त्यास विलंब झाल्यास संबंधित महिला बचत गटांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
३१ महिला बचत गटांना सकस आहार पुरविण्याचा ठेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 00:14 IST