नाशिक : पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत ‘इनकमिंग’ सुरूच असून, गेल्या दोन दिवसात जिल्हा बॅँकेत सुमारे २७० कोटींचा भरणा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या जिल्हाभरात २१३ शाखा असल्याने सभासदांनी पैसे काढण्यासाठी सर्वच शाखांमध्ये गर्दी केल्याने दोन दिवसांत तीन कोटी २० लाखांचे वाटप करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे गर्दीचा ओघ पाहून जिल्हा बॅँकेने रिझर्व्ह बॅँकेकडे ५० कोटींची मागणी केली होती; मात्र अवघे तीन कोटी रुपये देऊन जिल्हा बॅँकेची बोळवण करण्यात आल्याचा आरोप काही संचालकांनी केला आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत एकाच दिवसात सुमारे १०० कोटींहून अधिक रकमेचा बचतखाते, कर्ज खाते, सोनेतारण कर्जासह अन्य कर्जापोटी भरणा करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. शनिवारी दुसरा शनिवार असूनही केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे बॅँका सुरूच राहिल्याने शनिवारी दिवसभरात जिल्हा बॅँकेत २१३ शाखांमधून तीन कोटी रुपयांचे चार हजारांपासून १० हजारापर्यंत वितरण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रत्यक्षात सभासदांचा रेटा पाहून जिल्हा बॅँकेच्या प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सभासदांना वाटप करण्यासाठी ५० कोटी रकमेची आवश्यकता असल्याचे कळविले होते; मात्र शुक्रवारी (दि. ११) जिल्हा बॅँकेला सुरुवातीला २० लाखांची व नंतर तीन कोटींची रक्कम उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर शनिवारी दुपारपर्यंत एकूण शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांत तीन कोटी २० लाखांची रक्कम सभासदांना वितरित करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्हा बॅँकेच्या जिल्हाभरात शाखा असून, काही अतिदुर्गम भागात फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्याच शाखा असल्याने तेथे खातेदारांनी रक्कम काढण्यास गर्दी केली असता जिल्हा बॅँकेकडे पैसे नसल्याने ते खातेदारांना वाटण्यास अडचणी आल्याचे संचालकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
दोन दिवसांत २७० कोटी जमा, तीन कोटींचे वाटप
By admin | Updated: November 13, 2016 01:10 IST