त्र्यंबकेश्वर : ब्रह्मगिरीकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या रस्त्याच्या कडेला वन विभागाच्या हद्दीत असलेली व या विभागाने अतिक्रमित म्हणून ठरविलेली दुकाने व तात्पुरती वसतिस्थाने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जमीनदोस्त केली. त्यामुळे सुमारे वीस कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. यामुळे विस्थापितांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.ब्रह्मगिरी व गंगाद्वार म्हणजे त्र्यंबकेश्वरचे भूषण मानले जाते. लाखो भाविक या दोन्ही पहाडांवर येतात. तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गर्दी करतात. ब्रह्मगिरीचे मुख्य स्थान म्हणजे गोदावरीचे उगमस्थान पाहण्यासाठी लोक येतात. अशा या पहाडाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अनेकांनी वेगवेगळी दुकाने थाटली आहेत. ब्रह्मगिरी व गंगाद्वारला जाण्याच्या वाटेवर अनेकांनी लिंबू सरबत, थंड पेये, पाण्याच्या बाटल्या, भेळभत्ता आदिंची दुकाने मांडली आहेत. माकडांसाठी चणे फुटाणे विकले जातात. काठीचा पायऱ्या चढण्यासाठीही उपयोग होतो. वास्तविक उदरनिर्वाहासाठी राहणाऱ्या लोकांनी तेथे जागा बळकावून शेती केली नाही की पक्की सीमेंटची घरे बांधली नाहीत. कुडाचे व प्लॅस्टिकच्या भिंती व वरती पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून पत्रे असा त्यांचा प्रपंच आहे; मात्र याचा कोणताही विचार न करता अतिक्रमणे पाडण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
२० कुटुंबे उघड्यावर
By admin | Updated: January 9, 2016 22:53 IST