नाशिक : महापालिका निवडणुकीमुळे प्रशासनाने यंदा एप्रिल ते जुलै २०१७ या चार महिन्यांच्या कालावधीसाठी लेखानुदान मांडण्याची तयारी सुरू केली असून, १५ फेबु्रवारीअखेर आयुक्तांकडून त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. सदर लेखानुदान मांडताना त्यात सुमारे ३५० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक दरवर्षी २० फेबु्रवारीपर्यंत आयुक्तांकडून स्थायी समितीला सादर होणे बंधनकारक असते. मात्र, यंदा महापालिका निवडणूक होत असल्याने प्रशासनामार्फत एप्रिल ते जुलै २०१७ या चार महिन्यांच्या कालावधीपुरता आयुक्तांच्या मान्यतेने लेखानुदान मांडले जाणार आहे. लेखानुदान मांडण्यासंबंधीची बैठक आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या दालनात सोमवारी (दि.३०) झाली. यावेळी मुख्य लेखापाल सुभाष भोर यांनी महापालिकेच्या एकूण जमा व खर्च बाजूचा ताळेबंद सादर केला, तसेच विविध विभागांमार्फत तातडीने आर्थिक तरतुदीसंबंधीची माहिती मागविण्यात आली. सदर लेखानुदान मांडताना त्यात सुमारे ३५० कोटी रुपये खर्चाची तरतूद केली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेचे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रकही सादर करण्याविषयी लेखा विभागाकडून काम सुरू असून, ते सुद्धा लवकरच आयुक्तांना सादर केले जाणार असल्याची माहिती भोर यांनी दिली. येत्या १५ फेबु्रवारीपर्यंत सदर लेखानुदान मांडले जाणार असून, त्यावर २३ फेबु्रवारीनंतरच कार्यवाही होणार आहे. चार महिन्यांचे लेखानुदान मांडल्यानंतर उर्वरित आठ महिन्यांच्याही अंदाजपत्रकाची तयारी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. महापालिकेत लोकनियुक्त सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर सर्वसाधारणपणे जुलै-आॅगस्टमध्ये स्थायी समितीपुढे आयुक्त अंदाजपत्रक सादर करतील. (प्रतिनिधी)
१५ फेब्रुवारीअखेर मनपाचे लेखानुदान
By admin | Updated: January 31, 2017 01:00 IST