पंचवटी : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पंचवटीतील सहा प्रभागातून जवळपास ८९ इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. कॉँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरदेखील पंचवटीतील प्रभाग क्रमांक १ चे कॉँग्रेसचे उमेदवार वसंत मोराडे व प्रभाग क्रमांक ३ मधील विपुल मंडलिक या दोघांनी उमेदवारी निश्चित होऊनही निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. पंचवटी विभागातील २४ जागांसाठी सव्वा दोनशेहून अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी एकूण ८९ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता २४ जागांसाठी १३७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मंगळवारी अर्ज माघारी घेण्यासाठी दुपारी तीन वाजेची अंतिम वेळ असली तरी काही नवख्या इच्छुकांनी तीन वाजेनंतर अर्ज माघारी घेण्यासाठी निवडणूक कक्षात धाव घेतली खरी, मात्र अर्ज माघारी घेण्याची वेळ संपल्याने त्यांना मागे फिरावे लागल्याचे चित्र दिसून आले. विविध पक्षांकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेल्या परंतु पक्षाने ऐनवेळी उमेदवारी डावलल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्या इच्छुकांची मनधारणी करून त्यांना अर्ज माघारीच्या दिवशी निवडणूक कक्षात अन्य पक्षांचे कार्यकर्ते घेऊन येत असल्याचे दिसून आले. अर्ज माघारीनंतर अधिकृत उमेदवार व माघार घेतलेल्या उमेदवारांनी एकमेकांची गळाभेट घेतल्याचे चित्र पंचवटी विभागीय कार्यालयात बघायला मिळाले. (वार्ताहर)
पंचवटी विभागात १३७ उमेदवार रिंगणात
By admin | Updated: February 8, 2017 01:04 IST