पेठ : आठवडाभरात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीसह घरांचेही नुकसान झाले असून, तालुक्यातील १२ कच्च्या घरांची पडझड होऊन साधारण ७२ हजारांचे नुकसान झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले पुरातन गावतळे बुधवारच्या मुसळधार पावसात ओव्हरफ्लो झाले असून, या तलावातून पाणी बाहेर जाण्यासाठी तळमोरी नसल्याने तलावातून बाहेर पडणारे पाणी थेट परिसरातील नागरिकांच्या घरात शिरल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते. नगरपंचायत प्रशासनाने या तलावाची पुनर्बांधणी करून ओव्हर फ्लो होणारे पाणी स्वतंत्र पाइपलाइनद्वारे गावाच्या बाहेर सोडावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.
--------------------
कोटंबी घाटात संरक्षक जाळी बसविण्याची मागणी
पेठ ते नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कोटंबी घाटात रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर डोंगराच्या बाजूने दरड कोसळण्याच्या घटना वाढत असून, उत्तराच्या दिशेने येणारे दगड थेट रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून घाटात संरक्षक जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
----------------------
रस्त्यांची लागली वाट
मुसळधार पाऊस, नद्यांना आलेला पूर व घाट रस्त्यांमध्ये कोसळलेल्या दरडी यामुळे तालुक्यातील जवळपास सर्वच रस्त्यांची चाळण झाली असून, अनेक ठिकाणी रस्तेच वाहून गेल्याने गावांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय डोंगरउतारावरून नागमोडी वळणे घेत तयार केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येते. मुख्य रस्त्यांसोबत वाडीवस्तीवर जाणारे रस्तेही मजबूत करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-------------------
पेठ तालुक्यात मुसळधार पावसामुळे घरांचे झालेले नुकसान. (२४ पेठ १)
240721\24nsk_3_24072021_13.jpg
२४ पेठ १