विंचूर विंचूरसह परिसरातील गावांसाठी अपघातात अथवा आपत्कालीन संकटात सापडलेल्या रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा देण्यासाठी दाखल झालेल्या शासनाच्या अद्ययावत रुग्णवाहिकेस प्रतिसाद मिळत असून, अपघातातील गंभीर जखमींसाठी रुग्णवाहिनी जीवनवाहिनी ठरू पाहत आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी विंचूरकरांच्या दिमतीला दाखल झालेल्या रुग्णवाहिकेमुळे संकटात सापडलेल्या शंभरच्या वर रुग्णांना आजपर्यंत जीवदान मिळाले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत सुरू असलेला १०८ क्रमांक फिरवा अन् रुग्णसेवा मिळवा हा उपक्रम वरदान ठरला आहे. शहरासह खेडोपाडी रस्त्यांचे मोठे जाळे विणले जाऊ लागले असून, वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे दिसून येते. तीन महिन्यांपूर्वी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रमांंतर्गत येथे तीन तज्ज्ञ डॉक्टरांसह अद्ययावत अशी रुग्णवाहिका सेवेसाठी उपलब्ध झाली आहे. २२ किलोमीटरच्या आत येणार्या गावांना या सेवेचा फायदा मिळत आहे. विंचूरसह लासलगाव, डोंगरगाव, भरवस, पाटोदा, बोकडदरे, नैताळे, देवगाव, रुई यांसह परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील अनेक गावांतील गरजू रुग्णांना आपत्कालीन सेवेचा लाभ मिळत आहे. नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्ग असल्याने विंचूर व परिसरात वारंवार अपघात घडत असतात. अपघात घडल्यास जखमींना ताबडतोब उपचार मिळणे गरजेचे असते. अपघात झाल्यास १०८ क्रमांकावर कुठूनही फोन केल्यास अत्याधुनिक वैद्यकीय सामग्री व निष्णात डॉक्टरांसह सुसज्ज असलेली रुग्णवाहिका अवघ्या वीस मिनिटांत हजर राहत असल्याने विंचूरसह परिसरातील वीस ते पंचवीस गावांतील आपत्कालीन रुग्णांसाठी रुग्णवाहिका जीवनवाहिनी ठरत आहे. अपघाताबरोबरच सर्व गंभीर स्वरूपाच्या आजाराचे रुग्ण, बाळंतपणातील गुंतागुंतीचे रुग्ण, नवजात अर्भकाशी संबंधित आजार, साथीचे रु ग्ण, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमध्ये सापडलेले रुग्ण, हृदयविकाराचे रुग्ण, सर्पदंश, विषबाधा, श्वासोच्छवासाचे गंभीर आजार, मेंदूशी संबंधित गंभीर आजार असणार्या रुग्णांनाही सदर रुग्णवाहिकेचा फायदा मिळत आहे. रस्त्यावरील अपघातातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने अशा अत्यवस्थ रुग्णांवर ‘गोल्डन अवर’मध्ये (सुरुवातीच्या तासात) उपचार मिळावेत यासाठी खास यंत्रणा उभारण्यात आली आहे. १०८ या टोल फ्री क्र मांकावर दूरध्वनी केल्यास पुढील पंधरा ते वीस मिनिटांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका रुग्णापर्यंत पोहोचून त्याला योग्य रुग्णालयात दाखल केले जाते, असे या यंत्रणेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. रुग्णवाहिका सर्वच बाबींनी परिपूर्ण असून, त्यात तीन डॉक्टर व इतर कर्मचारी युनिटही देण्यात आले आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली असून, आपत्कालीन रुग्णवाहिका व इतर कामे करण्याचे कंत्राट भारत विकास ग्रुप या कंपनीला देण्यात आले आहे. रुग्णवाहिकेचे कार्यक्षेत्र तीस किलोमीटर असून, कार्यक्षेत्राच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे विंचूर येथे रुग्णवाहिका चोवीस तास सेवेसाठी तत्पर असते. रुग्णवाहिकेसाठी विंचूर येथील तीन डॉक्टर्स व चालकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अपघात, अर्धांगवायू, हृदयविकार, जळीत, सर्पदंश आदि आपत्ती काळात रुग्णांना वेळेवर उपचार मिळत आहेत. सदर सेवा पूर्णपणे नि:शुल्क असून, घटनास्थळी रुग्णावर प्रथमोपचार सुरू करून त्यांना नजीकच्या किंवा तालुका रुग्णालयात पोहोचिवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. रुग्णवाहिकेला जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) बसविण्यात आली असल्याने फोन करताच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते. येथील जिल्हा परिषदेच्या दवाखान्याजवळ सदर शासकीय रुग्णवाहिका उभी करण्यात आलेली असून, २४ तास सज्ज असणार्या या रुग्णवाहिकेमध्ये ३५ विविध प्रकारांची वैद्यकीय अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात व्हेंटिलेटर मशीनपासून ते मध्यम शल्यचिकित्सा करण्यासाठी अत्यावश्यक अशा सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.
108 क्र मांक रु ग्णांसाठी ठरतोय वरदान
By admin | Updated: May 13, 2014 00:06 IST