नाशिककेंद्र व राज्यात एकमेकांच्या उण्यादुण्या काढून या ना त्या कारणाने खिंडीत पकडण्याचे डावपेच केंद्रात व राज्यात शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये सुरू असतानाच शिवसेनेच्या नाशिकच्या खासदाराने मात्र त्यांच्या मतदारसंघात तब्बल १०३ कोटींचा निधी भाजपाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाकडून मंजूर करून घेतल्याने दिंडोरीचे भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण रुसल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी याची दखल घेत तत्काळ दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय मार्ग प्रकल्प निधीतून प्रस्ताव मागवून घेतल्याने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून १५० कोटींचे प्रस्ताव व सिन्नर तालुक्यासाठी ५० कोटींच्या उड्डाणपुलाचा प्रस्ताव तत्काळ दिल्लीला पाठविण्यात येणार असल्याचे समजते.केंद्राच्या भूसंपादन कायद्याला शिवसेनेने विरोध केला असून, गावोगावी जाऊन संपर्क अभियानाद्वारे शेतकऱ्यांना या भूसंपादन कायद्याच्या जाचक अटींची माहिती देण्याचे काम सुरू केले आहे. दुसरीकडे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे या कायद्याला सहमती मिळविण्यासाठी केलेली शिष्टाई असफल ठरलेली असल्याने शिवसेना व भाजपात रुंदावलेली दरी आणखीच रुंदावत असतानाच आता स्थानिक खासदारांमध्ये केंद्रीय मार्ग प्रकल्प निधीवरून जुंपण्याची चिन्हे आहेत. नाशिक लोकसभेतून राज्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना पराभूत करून शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे खासदार झाले आहेत, तर दिंडोरीतून हॅट्ट्रिक करीत भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. एकीकडे हे सर्व घडत असताना शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांच्या मतदारसंघात नुकतेच केंद्रीय मार्ग प्रकल्प निधीतून (सी.आर.एफ.) १०३ कोटींची रस्त्यांची कामे मंजूर केली आहेत. त्यात इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी-भावली-वासाळी-टाकेद-भंडारदरावाडी रोड या ४९ किलोमीटरच्या कामासाठी ५० कोटी, सिन्नर तालुक्यात ब्राह्मणवाडे-देशवंडी-बारगावप्रिंपी या १६ किलोमीटरच्या कामासाठी १६ कोटींचे काम, तर नाशिक-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आडगाव-म्हसरूळ-गिरणारे मार्गे ओझरखेड या २९ किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामासाठी ३७ कोटी अशी एकूण १०३ कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
१०३ कोटींची कामे मंजूर : नाशिकला मेवा, तर दिंडोरीला लागला हेवा
By admin | Updated: March 3, 2015 00:48 IST