नाशिक : ‘नाशिक मला दत्तक देणार काय..’, अशी साद घालणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भरभरून प्रतिसाद देत नाशिककरांनी भाजपाला आपले पालकत्व बहाल केले. निवडणुकीत तब्बल ६६ जागा खिशात टाकत महापालिकेच्या गेल्या २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. एकहाती शतप्रतिशत यश मिळविणाऱ्या भाजपाने शिवसेनेला ३५ जागांवरच रोखले. नवनिर्माणाच्या दुसऱ्या पर्वाचे स्वप्न दाखविणाऱ्या मनसेला नाशिककरांनी साफ झिडकारले. भाजपाच्या त्सुनामीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीची लव्हाळी कशीबशी वाचली. अपेक्षेप्रमाणे अपक्षांची संख्या घटली. छोटे पक्ष तर पुरते नामशेष झाले.नाशिक महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ६१.६० टक्के विक्रमी मतदान झाले होते. त्याचवेळी परिवर्तनाची चाहूल लागली होती. महापालिका निवडणुकीत प्रामुख्याने, सेना-भाजपामध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू होती. त्यात, अनपेक्षितपणे भाजपाने जोरदार मुसंडी मारत बहुमतासाठी आवश्यक असलेला ६२ जादुई आकडा पार केला. मागील निवडणुकीत स्वबळावर १४ नगरसेवक निवडून आणणाऱ्या भाजपाने प्रथमच निर्भेळ यश संपादन केले. निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालाचीही नोंद झाली आहे. माजी महापौर यतिन वाघ, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या व माजी महापौर नयना घोलप यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर मनसेचे विद्यमान महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी विजयाला गवसणी घातली. नाशिकमध्ये दोन प्रभागांमध्ये मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष आघाडीचा झालेला पॅटर्नही यशस्वी ठरला. शिवसेनेच्या जागा वाढल्या असल्या तरी त्यांची सत्तापदाची हवा भाजपाने काढून घेतली. तब्बल ४२ नगरसेवकांना पराभवाचा धक्का बसला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केलेल्या १४ नगरसेवकांनाच विजय संपादन करता आला. भाजपाच्या यशानंतर कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी एकत्र जमत एकच जल्लोष केला.
शतप्रतिशत भाजपा
By admin | Updated: February 24, 2017 02:50 IST