पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पथकाने भल्या सकाळीच अचानक भेट दिल्याने उघड्यावर प्रातर्विधीस जाणाऱ्या ग्रामस्थांची तारांबळ उडाली. यावेळी पथकाने १० जणांना गुलाब पुष्प देऊन ‘गुड मॉर्निंग’ करत शौचालयांचा वापर करण्याचे आवाहन केले.गटविकास अधिकारी धनंजय जगताप, कृषी विस्तार अधिकारी प्रवीण गायकवाड, शाखा अभियंता आर. एल. राठोड, विस्तार अधिकारी आर. एन. बिरारी, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील कुऱ्हे, पशू वैद्यकीय अधिकारी आर. एल. पगार, माधव शेळके, राजू सिरसाट आदिंचा समावेश असलेल्या पथकाने पाथरे खुर्द येथे भेट दिली. सकाळीच उघड्यावर प्रातर्विधीस निघालेल्या ग्रामस्थांच्या स्वागताला थेट पथकातील अधिकारीच हातात गुलाब पुष्प घेऊन उपस्थित असल्याचे दिसून आल्यावर त्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी १० जणांना गाठत त्यांना गुलाब पुष्प देऊन ‘गुड मॉर्निंग’ केले. यावेळी ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व पटवून देत त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत गटविकास अधिकारी जगताप यांनी शौचालयासाठी अनुदान देणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. मार्च २०१६अखेरपर्यंत पाथरे खुर्द गाव हगणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. गाव शंभर टक्के हगणदारीमुक्त करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतअसून, पंचायत समितीमार्फतही सहकार्य केले जात आहे. यासाठी ग्रामस्थांनी अनुकूल मानसिकता तयार करायला पाहिजे, असे प्रतिपादन पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र घुमरे यांनी केले. शौचालयाचे महत्त्व आणि बॅँकांचे सहकार्य याबाबत गावकऱ्यांना माहिती देण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी सरपंच ललिता डोंगरे, उपसरपंच सुकदेव गुंजाळ, जगन मोकळ, रवि शिनारे, बाबासाहेब चिने, अनिता गुंजाळ, अशोक डोंगरे, नामदेव बेंडकुळे, सुभाष गुंजाळ, कैलास माळी, ग्रामसेवक गोविंद मोरे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
१० जणांना ‘गुड मॉर्निंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2016 22:13 IST