राज्य शासनाने दहावीच्या निकालाची सूत्रे नुकतीच जाहीर केली आहेत. ५०, ३०, २० ही सूत्रे अभ्यासात सर्वसामान्य असणाऱ्यांना विद्यार्थ्यांना फायदेशीर असली तरी जे विद्यार्थी अभ्यासू आहेत, त्यांना यामुळे नुकसान होणार असून अशा विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश कसा मिळू शकेल याची चिंता लागली आहे. कारण जे विद्यार्थी अभ्यासू आहेत त्यांच्या दृष्टीने दहावीची परीक्षा घेतली असती तर गुणांच्या आधारे अशा विद्यार्थ्यांना अकरावी साठी आपले आवडीचे महाविद्यालय भेटले असते. मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाने दहावीची परीक्षा न घेता नववीच्या गुणांच्या आधारे तसेच अंतर्गत मूल्यमापन आधारे गुण देण्यात येणार असल्याने सर्वसामान्य तसेच हुशार विद्यार्थी दहावीच्या निकालात एकाच रांगेत दिसून येणार आहेत.
दहावीच्या निकालासाठी गृहपाठ, तोंडी परीक्षा तसेच प्रात्यक्षिक परीक्षेसाठी शाळांना पुन्हा एकदा तयारी करावी लागणार आहे. अंतर्गत लेखी मूल्यमापन अनेक शाळांचे तयार असले तरी बहुतांश शाळांचे अंतर्गत मूल्यमापन तयार असेलच असे नाही. कारण शाळा चालू झाल्या होत्या त्यावेळेस सर्व शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे शिक्षकांचा कल दिसून येत होता. शिवाय विद्यार्थ्यांच्या वही, पुस्तक यांना स्पर्श करावयाचा नसल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी कानोसा घेता आला नाही. तरी सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के लागणार आहे. २०२० - २०२१ या शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी दहावीला आहेत, त्यांपैकी जे हुशार विद्यार्थी असतील त्यांना आयुष्यभर परीक्षा विना आपण अकरावी साठी पुढे ढकलले गेल्याचे मनात सलत राहील. हुशार विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी सीईटीमध्ये संधी शोधावी लागणार आहे.
दहावी बोर्डाचे वर्ष असल्यामुळे यावर्षी खूप अभ्यास केला होता. मात्र नववीच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल सर्व विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक असला तरी दहावीची परीक्षा घेतली असती तर अकरावी प्रवेश सुलभ झाला असता.
सुहास माळी, जयनगर.
दहावीची परीक्षा ऑफलाईन झाली असती तर अभ्यासू विद्यार्थ्यांना आनंदच झाला असता, मात्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार निकाल तयार करतांना हुशार विद्यार्थी व सर्वसामान्य विद्यार्थी एकाच रँकमध्ये येणार नाहीत. याची दक्षता निकाल तयार करतांना घ्यायला हवी.
धनराज दत्तू माळी, जयनगर.