लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार जिल्हा हा ऊस उत्पादनासाठी पोषक जिल्हा आहे. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे २५ लाख टन ऊसाचे उत्पादन होऊ शकते. त्यामुळे भविष्यातील नियोजन लक्षात घेऊन कारखान्याची गाळप क्षमता अडीच हजार टनावरून साडेसात हजार टन केल्याची माहिती आयान शुगरचे कार्यकारी संचालक रवींद्र बडगुजर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
ऊस गाळपाचे भविष्यातील नियोजन काय?नंदुरबार जिल्ह्यात सद्या तीन साखर कारखाने सुस्थितीत सुरू आहेत. या तिन्ही कारखान्यांना पुरेल इतका ऊस जिल्ह्यात असतो. गेल्या दोन वर्षांपासून पाऊस समाधानकारक झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे. शिवाय इतर पिकांना हमीभावाची हमी नसल्याने व वातावरणातील बदलाने उत्पादनाची हमी नसल्याने शेतकरी आता ऊस पिकाकडे वळू लागला आहे. म्हणून पूर्वीप्रमाणे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाचे ऊत्पादन होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊनच कारखान्याचा विस्तार करण्यात आला असून या विस्तारीकरणामुळे यंदा कारखाना उशीरा सुरू झाला. तरीही कारखान्याकडे सद्या साडेसात हजार एकर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत साडेपाच लाख टनापेक्षा अधीक ऊस गाळपाचे उद्दीष्ट आहे. आतापर्यंत गेल्या दहा दिवसात ६८ हजार टन ऊस गाळप झाला आहे. ऊस लागवडीसाठी कारखान्याकडे शेतक-यांना प्रोत्साहन देणा-या योजना आहेत का?यावर्षी त्याबाबत अधीक भर देण्यात आल्याने आतापर्यंत गेल्या वर्षाच्या तुलनेत तीन पटीने ऊस लागवड अधीक झाली आहे. यापुढे या लागवडीला अधीक गती येणार आहे. येत्या काळात शेतक-यांसाठी ऊस विकास योजना राबविण्याबाबत व्यवस्थापन निश्चितच प्रयत्न करणार आहे. कारखान्याकडे जिल्ह्यासह शिंदखेडा, चोपडा भागातूनही शेतकरी ऊस गाळपासाठी पाठवतात. त्या भागात एकही कारखाना सुरू नसल्याने तेथील ऊसही कारखान्याकडे गाळपाला येतो.
स्लीप बॅाय ते कार्यकारी संचालक... रवींद्र बडगुजर यांनी १९८६ मध्ये सातपुडा साखर कारखान्यात स्लीप बॅायच्या नोकरीला सुरुवात केली. शिक्षण घेत असतांना ते ही नोकरी करीत होते. पुढे तेथेच लॅब टेक्नीशियन, मॅन्यूफॅक्चरींग टेक्नीशियन अशी त्यांना बढती मिळाली. त्यानंतर त्यांनी बडोली, खरगोन, कऱ्हाड, मढी आदी विविध ठिकाणी नोकरी केली. २०१५ मध्ये एम.डी.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते कार्यकारी संचालक पदावर रुजू झाले. आयान शुगरमध्ये २०१८ पासून ते या पदावर आहेत. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी आपले हे यश संपादन केले आहे. वेळेवर बिलाची रक्कम अदा करणार... शेतकऱ्यांच्याऊसाच्या बिलाची रक्कम कारखान्यातर्फे यापूर्वीही नियमानुसार १४ दिवसात देण्यात येत होती. यंदा देखील नियमानुसार वेळेत रक्कम देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्यात ऊस उत्पादनासाठी पोषक वातावरण असल्यानेच कारखान्याचा विस्तार केला असून ऊस विकास योजना राबविण्यासंदर्भात कारखाना निर्णय घेणार आहे. -आर.सी.बडगुजर