बीजप्रक्रियेसाठी देशी गोमूत्र, शेण, माती हे सेंद्रिय घटक वापरून उत्तम बीजप्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच जमिनीची सुपीकता व मातींची उपयोगीता ही आपल्या उत्पन्न वाढीवर कशी प्रभावी ठरते याचे महत्त्व ही सांगितले. कोणत्या प्रकारची नांगरणी पद्धत जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. बीजप्रक्रिया कशी फायदेशीर ठरते याचे मार्गदर्शन कृषी सहायक अमोल वायवडे यांनी केले.
दरम्यान, राजीव गांधी भवनात सामाजिक कार्यकर्ते चंद्रसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली व कृषीविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी या बीजप्रक्रिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मोलगी, भगदरी, वेलखेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रास्ताविक मनोहर पाडवी यांनी केली. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक दिलीप गावित व कृषी सहायक अमोल वायवडे यांनी बीजप्रक्रियेची सखोल माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली, तर आभार आपसिंग वसावे यांनी मानले.
मोलगी परिसरातील खरीप हंगामातील प्रमुख पिके म्हणजे मका, ज्वारी, भात, तूर, उडीद, सोयाबीन, भगर, बर्टी हे असून, अजूनही शेतकरी शेतीसाठी आपली परंपरागत बियाण्यांचा वापर करीत आहे. परंतु लावण्याच्या पद्धतीतील चुकांमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनात घट होते. हे टाळण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील शेती विषयक मार्गदर्शन व बीजप्रक्रियेविषयी योग्य मार्गदर्शन आवश्यक असल्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शेती विषयक मार्गदर्शन व सल्ला घेण्यासाठी कृषी विभाग व मोलगी परिसर सेवा समिती ही शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी दिली. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी याच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.