नंदुरबार : लाॅकडाऊनमुळे अनेक उद्योगधंद्यांची आर्थिक स्थिती ढासळल्याने कामगार कपात करण्याचे निर्णय घेण्यात आले होते. यातून अनेकांचा रोजगार हिरावला जावून त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. यातून मार्ग काढून पूर्वपदावर येत असलेल्या उद्योगांमध्ये नोकरीची संधी मिळेल म्हणून सर्वचजण कामाला लागले असून नोकरीसाठी काैशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांमध्ये नोंदण्या वाढत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या आठ महिन्याच्या काळात एकूण ४३ हजार बेरोजगार युवक-युवतींनी नोंदण्या केल्या आहेत. त्यांच्याकडून राज्यातील विविध भागात नोकरी करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. मुले आणि मुली अशा दोन्हींकडून या नोंदण्या करण्यात आल्या असून खासगी कंपनीत नोकरी करण्यासाठी उत्सुकता असल्याचे नोंदणी दरम्यान दिसून आले आहे. जिल्ह्यात रोजगार कॅम्पही गेल्या काही वर्षात घेण्यात आले होते.
राज्यशासनाकडून गेल्या काही महिन्यापूर्वी एकत्रित रोजगार महामेळावा घेत युवकांना आमंत्रित केले होते. नंदुरबार येथे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या मेळाव्यात १ हजार २०० पेक्षा अधिक युवक-युवतींनी हजेरी दिली होती. यातील ४०० जणांच्या मुलाखती झाल्याचे समजते.
युवक गुजरातकडे...
नंदुरबार जिल्ह्यातील सुशिक्षित युवक रोजगारासाठी नजीकच्या सुरत या शहराला पसंती देतात. याठिकाणी विविध उद्योगात कुशल व अकुशल अशी दोन्ही कामे तात्काळ मिळत असल्याने युवकांचा ओढा असतो.
सुरत किंवा गुजरातमधील इतर ठिकाणी राहण्या-खाण्याची व्यवस्था होत असल्याने युवा वर्गाचे स्थलांतर गेल्या काही वर्षात वाढले आहे.
युवकांच्या नोंदण्या ह्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात. ऑनलाईन असल्याने त्यातून नोकरीसाठी अर्ज करणे वगैरे प्रोसेस युवकांकडून केली जाते. जिल्ह्यातून युवकांकडून ऑनलाईन पद्धतीने सर्व उपक्रमांची पडताळणी केली जाते.
-विजय रिसे, सहायक संचालक
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार.
ऑनलाईन कामकाज
n विभागाकडून नोंदणीचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आले आहे. युवक-युवती घरबसल्या नोंदण्या करून घेत असल्याचे दिसून येत आहे. विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने नोकरी मेळावेही घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.