तळोदा : जन आशीर्वाद यात्रेनिमित्त भाजपतर्फे गुरुवारी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांपुढे तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांच्या पाढा उपस्थितांनी वाचला होता. याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. केंद्रीय महिला, बालकल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची जन आशीर्वाद यात्रा तळोदा येथे गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. या यात्रेनिमित्त आदिवासी सांस्कृतिक भवनात महिला मेळावा घेण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे आदिवासी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार डॉ. अशोक उईके, प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, खासदार डॉ. हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रकाश गेडाम, किशोर कळकर, राजेंद्र गावीत, तळोदा तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, शहादा विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, शानुबाई वळवी, निलाबेन मेहता, किन्नरी सोनार आदी उपस्थित होते.
तळोदा उपजिल्हा रुग्णालयात अनेक समस्या आहेत. तेथे धड वैद्यकीय अधिकारी पुरेसे नाहीत. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सुविधादेखील पुरेशा प्रमाणात मिळत नाही. बहुतेक पदेदेखील रिक्त आहेत. तेथील तांत्रिक उपकरणेही नादुरूस्त आहेत. एवढेच नव्हे तर बाह्य रुग्णांची ओपिडीसुध्दा कधी कधी बंद असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. अशा अनेक समस्यांचा पाढाच नागरिकांनी वाचला होता. खुद्द खासदार डॉ. हिना गावीत यांनीदेखील या रुग्णालयातील मंजूर ऑक्सिजन प्लांट अजूनही सुरू झाला नसल्याने त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. हे सर्व प्रश्न ऐकून मंत्री भारती पवार यांनी येथील यंत्रणेकडून संपूर्ण अहवाल मागवून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे सांगितले. त्याचबरोबर जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून त्यावर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे ठोस आश्वासन देऊन निदान मोदी सरकारने आरोग्याचा ज्या योजना दिल्या आहेत. त्यात स्वाभिमान भारत, जननी सुरक्षा, उज्ज्वला योजना यांचा लाभ गोरगरिबांना मिळवून देण्याकरिता कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी राज्य शासनाच्या खावटी योजनेवर त्यांनी टीका केली. कारण अजूनही मोठ्या प्रमाणावर लाभार्थींना त्याचा लाभ मिळालेला नाही. डॉ. अशोक उईके, आमदार राजेश पाडवी, विजय चौधरी, शानुबाई वळवी यांनीही केंद्र सरकारच्या योजनांचा लेखाजोखा मांडला.
मेळाव्याचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी यांनी केले. कौशल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा सरचिटणीस राजू गावीत यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यासाठी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल शेंडे, दारासिंग वसावे, हेमलाल मगरे, ईश्वर पोटे, संजय कर्णकर, योगेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, सोनार समाजातील महिलांनी गणेश सोनार यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
भाजी विक्रेेतीकडून घेतली भाजी
केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेला शहरातील हातोडा नाक्यापासून सुरूवात करण्यात आली होती. मेन रोड मार्गे जाणाऱ्या यात्रेत त्यांचा सर्वच नागरिकांनी सत्कार केला होता. गृहिणींनी त्यांचे औक्षण केले होते. नागरिकांनी केलेल्या अशा स्वागताने त्या भारावल्या होत्या. एवढेच नव्हे तर या रस्त्यावर एका आदिवासी महिलेला भाजी विकताना पाहून त्यांनी तिच्याकडील कंटुरली विकत घेऊन तिची आस्थेने चौकशी केली. तेव्हा ही महिला आनंदाश्रूनी अक्षरशः रडली होती. कार्यक्रम स्थळीदेखील त्यांनी आदिवासी महिलांसोबत वाद्याच्या तालावर फेर धरला होता. शिवाय त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्याशी हितगूज करीत सेल्फीदेखील काढला.