शेल्टी व परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह मजुरांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. शेल्टी येथे वरुणराजाला साकडे घालण्यासाठी पूर्वकालीन चालत आलेली प्रथा जोपासत हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण, धोंडी-धोंडी पाणी दे... साय माय पीकू दे म्हणत गावातून परमेश्वराला साकडे घालण्यात आले. पावसाची दडी, पिकांची शेवटची घटका, गेल्या अनेक वर्षांपासून अवेळी आणि अपुऱ्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याला नापिकीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी तरी बऱ्यापैकी पाऊस होईल या आशेने बी-बियाणे व खतांची जुळवाजुळव केली; मात्र पाऊस नसल्याने पेरणी लांबणीवर गेली आहे. रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी शेल्टी येथील ग्रामस्थ व महिलांनी रामधून म्हणत गावाच्या सीमेपर्यंत दिंडीने जात साकडे घातले.
शेल्टी येथे महिलांकडून वरुणराजाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST