नंदुरबार : मद्यपी पतीकडून सतत होणाऱ्या मारहाणीच्या त्रासाला कंटाळून विरपूर ता़ अक्कलकुवा येथे विवाहितेने आत्महत्या केल्याची घडना गुरुवारी उघडकीस आली़ याबाबत पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़वारंवार माहेरी का जातेस या कारणावरुन मालती केसरसिंग पाडवी (३४) रा़ विरपूर ता़ अक्कलकुवा यांना पती केसरसिंग भागा पाडवी यांच्याकडून दारु पिऊन सतत मारहाण होत असल्याची फिर्याद देण्यात आली आहे़ गेल्या दोन वर्षांपासून मयत महिलेस शिवीगाळ व मारहाण करण्यात येत होती़ वारंवार पतीकडून अशा प्रकारे छळ करण्यात येत असल्याने मयत मालती पाडवी अनेक वेळा माहेरी निघून जात असत़ बुधवारी १५ रोजीदेखील मालती आपल्या माहेरी आल्या असता पती केसरसिंग पाडवी यांनी जोरदार भांडण केले होते़ सतत माहेरी का जाते असा जाब विचारत पुन्हा माहेरी आल्यास जिवेठार मारु अशी धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे़ माहेरी भांडण झाल्यानंतर पती केसरसिंग याने मालती यांना आपल्या घरी आणले़ परंतु घरी आल्यावर पुन्हा पतीचा त्रास सुरु झाल्याने अखेरी या जाचाला कंटाळून मालती यांनी विरपूर येथील एका शेतात विषारी द्रव्य प्राशन केले़ यातच त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत मालती यांचे भाऊ भिमसिंग खेमा वसावे (२४) रा़ डांबरापाडा ता़ अक्कलकुवा यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ पुढील तपास पोलिस हवालदार मुकेश पवार हे करीत आहेत़
पतीच्या मारहाणीला कंटाळून विरपूर येथे महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 12:55 IST