नंदुरबार दीड शतकाच्या घरात
नंदुरबार तालुका रुग्णसंख्येबाबत आठवडाभरात दीड शतकाच्या घरात पोहचला आहे. तर शहादा तालुक्याने शतक पार केले आहे. तळोदा व नवापूर तालुक्यानेही दोन आकडी संख्या गाठली आहे. नंदुरबार तालुक्याचा विचार करता २५ फेब्रुवारी रोजी २१ रुग्ण आढळले होते. २६ फेब्रुवारी रोजी २९, २७ फेब्रुवारी रोजी पाच, २८ फेब्रुवारी रोजी ११, १ मार्च रोजी १२, २ मार्च रोजी ४१ तर ३ मार्च रोजी २७ रुग्ण आढळून आले होते. तालुक्यात १४६ रुग्ण आढळून आले. तालुक्यातील रुग्णसंख्या आता ३,७१२ पर्यंत गेली आहे.
शहादा तालुका देखील शतकपार गेला आहे. तालुक्यात २५ फेब्रुवारी रोजी १०, २६ रोजी एकही नाही, २७ रोजी ६३, २८ रोजी पाच, १मार्च रोजी १२, २ रोजी १३ तर ३ रोजी १० रुग्ण आढळून आले होते. सात दिवसात एकूण ११३ रुग्ण आढळून आले असून तालुक्याची रुग्णसंख्या ही ३,७९९ पर्यंत पोहचली आहे.
दुर्गम भाग अद्यापही सुरक्षित
जिल्ह्यातील दुर्गम भागाने अर्थात अक्कलकुवा व धडगाव तालुक्यांनी पूर्वीपासून कोरोनाला लांब ठेवले आहे. सात दिवसात या तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यापूर्वी देखील रुग्ण आढळून आलेेले नाहीत. अक्कलकुवा तालुक्यात आतापर्यंतची रुग्ण संख्या अवघी २७७ तर धडगाव तालुक्याची फक्त १०२ इतकी आहे.
दुसरीकडे तळोदा व नवापूर तालुक्यांनीही रुग्ण संख्येवर बऱ्यापैकी अटकाव ठेवला आहे. सात दिवसांचा विचार करता २५ रोजी तळोदा तालुक्यात पाच तर नवापूर तालुक्यात दोन, २६रोजी तळोदा तालुक्यात तीन तर नवापूर तालुक्यात एक, २७ रोजी तळोदा तालुक्यात सात तर नवापूर तालुक्यात एक, २८ रोजी तळोदा तालुक्यात एकही नाही तर नवापूर तालुक्यात एक, १ मार्च रोजी तळोदा तालुक्यात २ तर नवापूर तालुक्यात तीन, २ मार्च रोजी तळोदा नाही तर नवापुरात दोन व ३ मार्च रोजी तळोदा तालुक्यात एक व नवापूर तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले आहेत. आठवडाभरात तळोदा तालुक्यात १८ तर नवापूर तालुक्यात १२रुग्ण आढळून आले आहेत.
ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती
ध्वनिक्षेपक वाहनांद्वारे कोरोनाबाबत काळजी घेण्याचे तसेच मास्क वापर, सोशल डिस्टन्सिंग यांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत याबाबत आवाहन केले होते. त्यानुसार ध्वनिक्षेपक असलेले वाहन पालिका क्षेत्रांच्या हद्दीत फिरत आहे. याशिवाय बसस्थानके, रेल्वे स्थानकांमध्येही मास्क लावण्यासंदर्भात आवाहन केले जात आहे.
ग्रामिण भागाकडे दुर्लक्ष
लग्न समारंभ किंवा सार्वजनिक कार्यक्रमांबाबत ग्रामीण भागाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. शहरी भागात ज्या प्रमाणे कारवाई होते त्या प्रमाणे ग्रामीण भागात होत नसल्याचे चित्र आहे. केवळ मंगल कार्यालये, लॅान्स किंवा सामाजिक सभागृहे यावरच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
पोलीस उतरले रस्त्यावर
मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी नंदुरबारात पोलीस रस्त्यावर उतरल्याचे दोन दिवसांपासून दिसत आहे. शहर व उपनगर पोलिसांतर्फे थेट कारवाई केली जात आहे. बुधवारी शहर पोलिसांतर्फे शहरातील विविध भागात कर्मचाऱ्यांचे पथकांनी कारवाई केली. काही दुकानांमध्ये जाऊन देखील कारवाई झाल्याने दुकानदारांनी दुकानात येतांना प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे.