ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे घराला आग लागून नुकसान झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली़ अवघ्या दीड तासात फोफावलेल्या आगीत संपूर्ण संसाराची राखरांगोळी झाल्याने रिक्षाचालकाचे कुटूंब उघड्यावर पडले आहे़खेडदिगर येथील रिक्षा चालक धनराज नवसारे यांच्या घरातून सकाळी ११ वाजेच्या धूर येत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले होते़ यावेळी नवसारे कुटूंबिय घरासमोरील झाडाखाली बसून होते़ त्यांनाही घराच्या मागील भागातून आगीचे लोळ येत असल्याचे दिसून आले होते़ अवघ्या काही सेकंदात आगीचे लोळ उठू लागल्याने ग्रामस्थांनी घराकडे धाव घेतली़ यावेळी काहींनी पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला़ परंतू आग रोखण्यात त्यांना अपयश आले़ दरम्यान शहादा आणि खेतिया येथे अग्नीशमन बंबाला माहिती देण्यात आली़ बंब याठिकाणी पोहोचल्यानंतर आग विझेपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले होते़ आगीत संसारोपयोगी साहित्यासह घरात साठवून ठेवलेला ५ क्विंटल गहू, हरभरा, कापूस, सोने चांदीचे दागिने, कपडे पूर्णपणे खाक झाले होते़आगीत जळालेल्या घराचा पंचनामा तलाठी योगिता पाडवी केला़ माहिती मिळाल्यानंतर त्यांनी येथे भेट दिली होती़ यावेळी म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक धनराज निळे , पोलीस कॉन्स्टेबल दादाभाई वाघ, चवरे, युवराज पाटील उपस्थित होते़ म्हसावद पोलीस ठाण्याकडून आगीची नोंद करण्यात आली असून आगीत सुमारे ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे़ खेडदिगर येथे सर्वांना परिचित असल्याने परिसरातील अनेकांनी येथे धाव घेत नवसारे कुटूंबाला मदत करुन धीर देण्याचा प्रयत्न केला़
अवघ्या काही मिनीटातच झाली रिक्षा चालकाच्या संसाराची राखरांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 11:42 IST