- रमाकांत पाटील
नंदुरबार : काँग्रेसमध्ये बंडाची धगधग शमत नाही तोच भाजपामधील अस्वस्थता वाढली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असतांना नटावदकर कुटुंबाने अर्ज खरेदी करून भाजपचा उमेदवार डॉ.हिना गावीत यांना झटका दिला असतांनाच त्यांचे खंदे समर्थक व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल रावल यांनी नाराजीचा सूर सुरू केल्याने पक्षांतर्गत नाराजी दूर करणे गावीतांपुढे आव्हानच ठरले आहे.नंदुरबार लोकसभा मतदार संघात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. असे असतांना या पूर्वी काँग्रेसचे नाराज उमेदवार भरत गावीत यांनी बंडाचा सूर पुकारला होता. पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीने काँग्रेसमधील नाराजी दूर झाल्याचे वृत्त पसरत नाही तोच भाजपमधील नाराजीचे नाटक सुरू झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी डॉ.सुहास नटावदकर, त्यांच्या पत्नी सुहासिनी नटावदकर आणि कन्या डॉ.समिधा नटावदकर या तिघांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज खरेदी केले आहे. भाजपने डॉ.हिना गावीत यांना उमेदवारी जाहीर केली असतांना नटावदकर कुटुंबाने खरेदी केलेल्या अर्जामुळे एक ना अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपमध्ये मतदार संघात गेल्या लोकसभा निवडणुकीपासून जुने कार्यकर्ते व नवे कार्यकर्ते असा वाद सुरू आहे. अधूनमधून अनेक वेळा हे वाद उफाळून आले. मात्र कधी प्रदेशाचे नेते तर कधी स्वत: खासदार डॉ.हिना गावीत व ज्येष्ठे नेते आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी हे वाद मिटविले. काही दिवसांपूर्वीच डॉ.हिना गावीत यांनी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या निवासस्थानी भेट देवून अंतर्गत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यावर उदेसिंग पाडवी यांनीही पक्षाचेच काम करण्याचा खुलासा दिला. त्यामुळे भाजपमध्ये आलबेल असल्याचे वातावरण पसरत नाही तोच नटावदकर कुटुंबाने खरेदी केलेल्या अर्जामुळे वादाला वेगळे तोंड फुटले आहे.एकीकडे उमेदवारी अर्जाची चर्चा सुरू असतांनाच मंगळवारी रात्री जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी समर्थकांची बैठक बोलावून वेगळा सूर धरला. रावल हे डॉ.विजयकुमार गावीत यांचे खंदे समर्थक मानले जातात. डॉ.कुमुदिनी गावीत या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असतांना रावल हे उपाध्यक्ष होते. सद्याच्या जिल्हा परिषद सभागृहात देखील रावल व त्यांच्या पत्नी एैश्वर्या रावल हे दोन्ही जिल्हा परिषद सदस्य आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे जयपाल रावलांचे भाचे आहेत. अर्थातच रावल परिवार हे भाजपशीच जुळले आहेत. असे असतांना अचानक त्यांनी समर्थकांना बोलावून चर्चा केल्याने आणि आगामी आठवड्यात भव्य मेळावा घेवून भूमिका जाहीर करण्याचे स्पष्ट केल्यामुळे भाजपातील अंतर्गत नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे.उमेदवारी मिळविण्यापूर्वी डॉ.हिना गावीत यांनी पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यात यश मिळविले होते. परंतु उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमधील समज-गैर समज वाढत असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ही नाराजी दूर करणे त्यांच्यासमोर आव्हानच आहे.