कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पुन्हा निर्बंध लादले आहेत. असे असले तरी सर्व व्यवहार सुरू असून, एसटी बसही सुरू झाल्या आहेत. शहरी भागात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, काही गावांमध्ये अद्यापही बस सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना टमटमने प्रवास करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शहादा आगारातील एकूण बसेस : १०७
कोरोनाआधी दररोज होणाऱ्या फेऱ्या : १०७
सध्या सुरू असलेल्या फेऱ्या : ७०
या गावांना टमटमचा आधार : शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. या वेळी नागरिकांना कुठं शहरी भागात जायचं असेल तर तालुक्यातील सुलतानपुर, खरगोन, कढेल, जयनगर, फेस, राणीपूर आदी गावांतील प्रवाश्यांना टमटमचा आधार घ्यावा लागत आहे.
२३ हजार कि.मी प्रवास; पण फक्त शहरांचाच : १)शहादा आगारासाठी १०७ पैकी ७० बस सुरू आहेत. या बसचा जवळपास २३ हजार ५०० किमीचा प्रवास सुरू असून जेमतेम डिझेलचा खर्च निघत आहे.
एकही बस ग्रामीण भागासाठी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
कोरोना काळात उत्पन्न निम्यावर आल्याने ग्रामीण भागात प्रतिसाद न मिळाल्याने २३ हजार ५०० किमीचा प्रवास फक्त शहरांचाच आहे.
‘राज्याने निर्बंध शिथिल केले व लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. अशात आगाराने एसटीच्या फेऱ्या ग्रामीण भागातदेखील सुरू केल्या होत्या. मात्र, त्यास प्रवासी प्रतिसाद न मिळाल्याने व डिझेलचा खर्च ही निघत नसल्याने काही फेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत. - योगेश लिंगायत, आगार प्रमुख शहादा
खेडेगावावरच अन्याय का ?
सध्या महाविद्यालय सुरू झाले असून, विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. त्याचबरोबर खाजगी वाहने वेळेवर भेटत नसल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून, महामंडळातर्फे ग्रामीण भागात एसटी सुरू करण्यात यावी. - देवा पवार, मुबारकपूर, ता.शहादा
शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी बसेस आहेत. परंतु, ग्रामीण भागातील सेवा अद्यापही बंद आहे. याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे ही सेवा तातडीने सुरू करावी. - कल्पेश भोसले, राणीपूर, ता.शहादा प्रवासी