लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : पांढरं सोनं म्हणून ओळखला जाणारा कापूस हे शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न देणारे पीक. पण वाहतुकी दरम्यान रस्त्यावर पडलेले हेच पांढरं सोनं अनेकांना रोजगाराचे साधन बनले आहे.खान्देशात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शेजारील गुजरात राज्यात कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग जास्त असल्याने खान्देशात उत्पादीत होणाºया कापसाला गुजरात राज्यात मोठी मागणी आहे. खान्देशातील धुळे, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कापूस अनेक व्यापारी अंकलेश्वर-बºहाणपूर राज्यमार्गाने गुजरातमध्ये वाहतूक करतात. वाहतुकीच्या दरम्यान रस्त्याची दुरवस्था हवेचा दाब, वाहनांचा वेग व अन्य कारणांमुळे वाहनात भरलेल्या कापसाची बांधणी सैल होते. त्यामुळे वाहनातून काही प्रमाणात कापूस रस्त्यावर पडत जातो. दिवसभर कापसाने भरलेली शेकडो वाहने या रत्यावर धावतात. त्यामुळे थोडा-थोडा करून बराच कापूस रस्त्यावर व रस्त्यालगत पडतो. रात्री अनेक वाहनात भरलेल्या कापसाची बांधणी सुटली तर अंधारात हा प्रकार वाहन चालक व सहचलकाच्या लक्षात येत नसल्याने अनेक वाहनांतून मोठ्या प्रमाणात कापूस खाली पडतो. रस्त्यावर पडलेला हा कापूस अनेकांच्या नजरेत भरत नसला तरी अंकलेश्वर-बºहाणपूर राज्यमार्गावर वसलेल्या गावातील काही जणांनी या कापसाला आपल्या रोजगाराचे साधन बनवले आहे. रस्त्यावर विखुरलेला हा कापूस गोळा करून त्याला स्वच्छ करून त्यातून हजारो रुपयांचे उत्पन्न घेतले जात आहे.तळोदापासून ते खापरपर्यंत सकाळच्या सत्रात सहा ते नऊ वाजेदरम्यान काही जण हा कापूस वेचताना रस्त्यालगत दिसतात. त्यांच्याशी संवाद साधला असता दिवसाला पाच ते सहा किलो कापूस अवघ्या आठ ते दहा किलोमीटर परिसरात सहज गोळा होत असल्याचे ते सांगतात. रस्त्यावर पडलेल्या या कापसाला चिटकलेली धूळ, माती व कचरा वेगळे करण्यात येते. नंतर या कापसाला एक-दोन दिवस उन्हात वाळवून त्याची बाजारात विक्री करण्यात येते. साधारण ४० ते ४५ रुपये प्रतीकिलो दराने हा कापूस बाजारात विकत घेतला जातो. वाहनातून रस्त्यावर पडणाºया व सर्वांच्या नजरेतून दुर्लक्षित राहणाºया कापसाला अनेकांनी आपल्या कमाईचे साधन बनविले आहे.
रस्त्यावर पडलेल्या या कापसाला स्वछ करून अनेक जणांनी हजारो रुपयांचे उत्पन्न घेतल्याची उदाहरणे आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील खापर नजीक असलेल्या कौलीगव्हाण या गावातील अत्र्या गोड्या वसावे हे नव्वदी पार केलेल्या वृद्ध दररोज रत्यावर व रस्त्यालगत पडलेला कापूस नित्यनियमाने गोळा करतात. त्यामुळे ते सर्वांचे आकर्षण व कुतूहलाचा विषय बनले आहेत. खापर ते अक्कलकुवा दरम्यान आठ ते दहा किलोमीटर अंतरात ते दिवसाला तब्बल सात ते आठ किलो कापूस गोळा करीत असून मागील अनेक वर्षापासून ते हे काम करीत असल्याचे सांगतात. त्यांच्यातला उत्साह तरुणांना लाजवणारा आहे.