नंदुरबार : बारावी परीक्षा कधी होईल, होईल तर त्याचे स्वरूप कसे असेल याबाबत विद्यार्थी वर्ग संभ्रमावस्थेत सापडला आहे. शासन स्तरावर अद्यापही गोंधळ सुरू आहे. दुसरीकडे वर्षभर अभ्यास करून बसलेला विद्यार्थी निर्णयाकडे लक्ष देऊन आहे. बारावी परीक्षेबाबत शिक्षण तज्ज्ञांमध्येही विविध मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनामुळे गेली वर्षभर शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. मध्यंतरी दोन ते अडीच महिने शाळा सुरू झाल्या, परंतु त्याचा फारसा उपयोग विद्यार्थ्यांना होऊ शकला नाही. ऑनलाईन माध्यमातूनच विद्यार्थ्यांनी बारावी सारखे महत्वाच्या वर्षाचा अभ्यास केला. वर्षभर घोकंपट्टी करून, तयारी करून बसलेला विद्यार्थी आता मात्र परीक्षा कधी होईल आणि कशी होईल या संभ्रमात पडला आहे.
वैद्यकीय, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन कायदा आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाला पुढील प्रवेशासाठी बारावीची परीक्षा महत्वाची असते. त्यानंतर सीईटी व विविध प्रवेश परीक्षा होत असतात. बारावी परीक्षेचे गुण विचारात घेतले जात नसले तरी विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनासाठी ही परीक्षा घेणे आणि तिचे स्वरूप लवकर ठरविणे गरजेचे आहे.
बारावीची परीक्षा व्हायलाच हवी. त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय देता येतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शक्य आहे त्यांनी ती द्यावी. उर्वरित विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देऊ शकता. त्यामुळे या दोन्ही पर्यायांचा विचार शासनाने करावा.
-बी.के.पाटील, शिक्षण तज्ज्ञ.