लाेकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एसटीच्या राज्यांतर्गत रातराणी सुरु झाल्या असल्या तरी परराज्यात जाणाऱ्या रातराणी बस अद्याप सुरू झालेल्या नाहीत. तिसऱ्या लाटेच्या भीतीपोटी अद्यापही प्रवाशांचा महामंडळाच्या रातराणी बसला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातून परराज्यात जाणाऱ्या सूरत, वापी, बडोदा, अहमदाबाद या रातराणी गाड्या सध्या सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना दिवसा सुरू असलेल्या व खासगी वाहनांचा वापर करत प्रवास करावा लागत आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोविड संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने जून महिन्यात अनलॉक प्रक्रिया सुरू केली. जिल्ह्यात अनलॉकमधील काही निर्बंध वगळता सर्व प्रकारच्या बाजारपेठा व उद्योग व्यवसाय आठवड्यातील पाच दिवस सायंकाळी चारपर्यंत सुरू ठेवण्याच्या मुभा आहेत. त्यामुळे व्यावसायिक व नागरिक इतर राज्यात खरेदीसाठी जात असून गर्दी वाढली आहे;मात्र एसटीची परराज्यातील रातराणी बंद आहे.
शहादा आगारातून पूर्वी शहादा - अहमदाबाद, बडोदा या परराज्यात जाणाऱ्या बस सुरू होत्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली होती. राज्य अंतर्गत शहादा - मुंबई व शहादा - पुणे ही रातराणी बस सुरू आहेत. महामंडळाच्या आदेशानुसार इतर राज्यात रातराणी बस देखील सुरू करण्यात येतील. प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. -योगेश लिंगायत आगारप्रमुख, शहादा
पूर्वी शहादा आगारातून अहमदाबादसाठी रातराणी बस धावत असल्याने गुजरात राज्यात व्यावसायिकांना खरेदीसाठी जाण्याचे सोयीचे ठरत होते. अनेक व्यावसायिक दुकानांना लागणारा माल घेण्यासाठी अहमदाबाद बडोदा गाठत होते; मात्र रातराणी बस बंद असल्याने अनेकांना प्रवास करणे अडचणीचे ठरत आहे. - श्याम पाटील, व्यावसायिक प्रवासी, शहादा
शहादा येथून सुरत, वापी, बडोदा, अहमदाबाद, पावागड, अंकलेश्वर आदी ठिकाणी जाण्यासाठी रातराणी बसमिळत होत्या; मात्र मागील दीड वर्षापासून या बस बंद असल्याने शहादा येथून गुजरात राज्यामध्ये जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. - चतुर्भुज शिंदे , प्रवासी, शहादा