ब्राह्मणपुरी : एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, असे सरकारचे धोरण आहे. मात्र, ज्या हातात पाटी-पेन्सिल असावी त्या हातात भीक मागण्यासाठी कटोरा आला. हे विदारक चित्र शहादा शहरातील बस स्थानक, महात्मा गांधी चौक, सप्तश्रृंगी मंदिर परिसर, स्टेट बँक परिसर, खेतीया चार रस्ता येथे पाहावयास मिळत आहे. अनेक लहान मुलांचा त्यांच्या आई-वडील किंवा जवळचे नातेवाईक त्यांच्याकडून भीक मागण्यासाठी वापर करीत असल्याचे वास्तव आहे.
शहाद्यातील मुख्य रस्त्यावरील प्रेस मारुती गेट जवळ सायंकाळी खवय्यांची गर्दी असते. याच गर्दीमध्ये काही लहान मुले भीक मागताना दिसतात. या मुलांना ‘लोकमत’ चे प्रतिनिधीने विचारले असता तेव्हा ही मुले सकाळी आठ वाजता घर सोडतात. दिवसभर भीक मागून संध्याकाळी आठ वाजता घरी जातात. या मुलांच्या शहरातच झोपड्या आहेत. आई भीक मागायला सांगते, असं एका चिमुकल्यानं सांगितलं. शाळेत का जात नाही तर म्हणे शाळा कुठंय, असे उत्तर त्याचं होतं.
बसस्थानकाचा आवार
शहादा शहरातील बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर लहान मुले भीक मागत असताना दिसतात. काही वेळा तर चक्क त्यांचे आई-वडील देखील भीक मागत असताना दिसून येतात. सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत भीक मागण्याची दिनचर्या असून, डोंगरगाव रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या झोपडीत ते राहतात.
सप्तशृंगी मंदिर परिसर
सप्तश्रृंगी मंदिर परिसरात खवय्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे भीक मागणाऱ्या लहान मुलांना सोयीचे ठरते. याठिकाणी आपल्याला पण काही तरी मिळेल या आशेने उभे राहत असून, येणाऱ्या नागरीकांकडून त्या भीक मागणाऱ्या मुलांना हातात काही सुट्टे पैसे, तसेच खाद्य पदार्थ दिले जाते. हे चिमुकले सायंकाळी प्रेस मारुती ग्राउंड परिसर, सप्तश्रृंगी माता मंदिर परिसरात भीक मागताना आढळून येतात.
अल्पवयीन लहान मुलांना बाजार पेठ किंवा मंदिरासमोर भीक मागायला लाऊन बरेच पालक नशापाणी करीत मुलांवर देखरेख करतात. कमी श्रमात मिळणाऱ्या भिकेमुळे अशी मुलांची संख्या वाढत आहे. यावर तातडीने अंकुश लावला पाहिजे.
- माणक चौधरी, शहादा.
खरं तर मुलांना भीक मागण्यास लावणे, हे चुकीचे आहे. त्यांच्या पालकांना समजले पाहिजे. त्या मुलांना बालहक्क मिळवून देण्यासाठी कागदोपत्री काम न करता शासनाने ग्राऊंड लेवलला उतरून काम केले पाहिजे. तसेच जे पालक मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त करतात अशांवर शासनाने वचक बसविला पाहिजे.
- नयना तावडे, शहादा