जयनगर : कोरोना महामारीमुळे माणसाच्या जीवन शैलीत खूप बदल झाल्याचे दिसून येत आहे. सोबतच अनेक रीतीरिवाज, प्रथा इत्यादी माणसाला बदलावे लागले. कोरोना काळातील लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे लग्नकार्यातील पत्रिका छापण्याची प्रथा बंद झाली असून, व्हाॅट्सॲपद्वारे लोकांना लग्नाची निमंत्रणपत्रिका पाठवली जात आहे. त्यामुळे भविष्यात लग्नपत्रिका छापणे इतिहास जमा होणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना महामारीमुळे अनेक गोष्टी माणसाने स्वतःहून बंद अथवा परिस्थितीनुसार बदलल्या आहेत. पूर्वी ज्या घरी लग्नकार्य असायचे तेथे शेकडोंच्या संख्येने पत्रिका नातेवाइकांना व आप्तस्वकीयांना वाटण्यासाठी छापल्या जायच्या; परंतु आता सोशल मीडियाच्या जमान्यात लग्नपत्रिका छापणे मागे पडू लागले आहे. मागील १५ महिन्यांच्या कालावधीत घराघरात लग्नपत्रिका मिळणे मुश्कील झाले आहे. कोरोना महामारीच्या अगोदर प्रत्येक घरात लग्नपत्रिकांचा खच साचायचा. दरवर्षी कमीत कमी २० ते जास्तीत जास्त ४०-५० लग्नांच्या निमंत्रणपत्रिका प्रत्येक घरी हमखास येत असायच्या. ज्याठिकाणी लग्नकार्याला जायचे आहे, त्या पत्रिका तारखेनुसार प्रत्येकाच्या घरी लावल्या जात असत. ज्यांच्या घरी लग्नकार्य असायचे ते वेगवेगळ्या रंगांचे, डिझाइनचे पत्रिका छापण्यावर भर द्यायचे. तीन रुपयांपासून ते जास्तीत जास्त १००-२०० रुपयांपर्यंत एकच पत्रिका छापली जायची. पत्रिकाच्या डिझाइनवरून किंवा पत्रिकेतील मजकुरावरून परिवाराच्या आर्थिक स्थितीचा अंदाज बांधला जायचा. मात्र, आता पत्रिका छापली जात नसल्यामुळे लग्नकार्यातील या खर्चालाही आळा बसण्यास मदत झाली आहे.
सद्य:स्थितीत सोशल मीडियाच्या जमान्यात पत्रिका छापणे पूर्णतः बंद झाले असून, पूर्वीप्रमाणे पत्रिका वाटण्यासाठी मोटारसायकलीवर जाणारेही आता दिसत नाहीत. त्यामुळे आता लोकांचा आर्थिक खर्च तर वाचलाच आहे. परिणामी, वेळेचीही मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. तसेच प्रवासात-उन्हातान्हात पत्रिका वाटप करणाऱ्या सदस्यांनाही त्रास व्हायचा. आता मोबाइलवरच व्हॉट्सॲपद्वारे नातेवाइकांना निमंत्रणपत्रिका पाठविली जात आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आता व्हाॅट्सॲपच्या पत्रिकेत भाऊबंदकीचे नाव घेतले जात नाही. त्यामुळे पूर्वी पत्रिका छापताना भाऊबंदकीचे एखादे नाव सुटले तर ते कुटुंब नाराज व्हायचे. बदलत्या काळात सोशल मीडियाद्वारे निमंत्रणाची ही पद्धत सोयीस्कर वाटत असली तरी पूर्वीप्रमाणे प्रत्येक नातेवाइकाच्या घरी जाऊन निमंत्रणपत्रिका देऊन लग्नाला बोलावल्यामुळे जे प्रेमाचे नाते व जिव्हाळा जोपासला जायचा तो आता दुरावत चालला आहे.