सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील बॅरेजमधून गेल्या १५ दिवसांपासून अधूनमधून गेट उघडून पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे तापी व गोमाई नदीतील पाणी कमी होत आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी नदीकाठावर पाईप लाईनद्वारे शेतीसाठी पाणी घेतले आहे त्यांना पाणी सोडल्याने अडचण येत आहे. अद्याप पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. काही शेतकऱ्यांनी पेरणी करून ठेवली आहे. अशा परिस्थितीत शेतपिकांना वेळोवेळी पाणी द्यावे लागते म्हणून बॅरेजमध्ये पाण्याची आवश्यकता आहे. पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रकाशा येथील शेकडो शेतकऱ्यांनी पाटबंधारे उपविभाग प्रकाशा यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, चालू हंगामात आजपर्यंत पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. पावसाळा लांबत आहे. अशा परिस्थितीत प्रकाशा बॅरेज प्रशासनाने पूर्ण क्षमतेने पाणी साठवणूक करणे गरजेचे आहे. गेल्या १५ दिवसांपासून अधूनमधून बॅरेजचे गेट उघडून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पाणीसाठा कमी होत आहे. चालू हंगामात पर्जन्यमान नसल्याने सध्यातरी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात प्रकाशा बॅरेजमधील पाणीसाठा कमी झाला तर मोठ्या समस्येला समोर जावे लागेल. आजच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रकाशा बॅरेजमधून पाणी सोडण्यात येऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन प्रकाशा येथील शेतकरी प्रकाश पाटील, अंबालाल चौधरी, शरद चौधरी, हरी पाटील, आनंद चौधरी, गिरीश पाटील, प्रकाश पाटील, विलास पाटील, संजय चौधरी, मोहन चौधरी, अनिल पाटील, प्रशांत पाटील, मनोज चौधरी, अशोक पाटील, प्रकाश ढोले, जगदीश पाटील, भटू पाटील, झेंडू बोरदे, छाया पाटील, सुहास पाटील, जितेंद्र चौधरी, सविता चौधरी, शोभा पाटील, भीम चौधरी, भरत चौधरी आदींसह शेकडो शेतकऱ्यांनी दिले.