नंदुरबार : पाच तालुक्यांच्या भूजल पातळीत मोठी घट आली असून सप्टेंबर २०१८ मध्ये नंतर भूजल सर्वेक्षण विभागाने मार्च २०१९ केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात तब्बल १ मीटरने भूजल खोल गेल्याचे समोर आले आहे़ यात सर्वाधिक गंभीर स्थिती ही नंदुरबार तालुक्याची असून येथे चार मीटरपर्यंत जमिनीतील पाणी खोल गेल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे़२०१८ च्या पावसाळ्यात सरासरी ६७ टक्के पावसाची नोंद झाल्याने सर्वच तालुके दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आले आहेत़ या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण विभागाने या तालुक्यांच्या पाणी पातळीचा मार्च अखेरीस आढावा घेतला होता़ यात सरासरी पाच वर्षाच्या तुलनेत खोलात गेलेल्या भूजल पातळीची स्थिती सर्वेक्षणाद्वारे जाणून घेण्यात आली़ दरम्यान नंदुरबार, शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात गंभीर स्थिती असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे़ विभागाने नियंत्रित केलेल्या ५० विहिरींच्या भूजलाची पडताळणी करुन अंतिम अहवाल तयार केला आहे़ यानुसार नंदुरबार तालुक्यात २४, नवापूर ७, शहादा ६३, तळोदा ५२, अक्कलकुवा ४७ आणि धडगाव तालुक्यात केवळ सात सेंटीमीटरने भूजल खोलात गेले आहे़ सरासरी १ मीटरपर्यंत हे भूजल खोल गेले असून यात दिवसागणिक वाढ होण्याची चिन्हे आहेत़पाण्याचा उपसा वाढून पुन्हा त्यात वृद्धी होण्याची कोणतीही उपाययोजना नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे़ परिणामी जिल्ह्याच्या भूगर्भातील २९ पाणलोट क्षेत्राचे प्रवाह हे दिवसेंदिवस कोरडे होत असल्याचे सांगण्यात आले आहे़ जमिनीखालील भूगर्भात कमी अधिक प्रमाणात पाणीसाठा असल्याने ही पातळी येत्या काळात आणखी कमी होणार असल्याचे सांगण्यात आले असल्याने चिंतेचा विषय ठरणार आहे़ सप्टेंबर २०१८ मध्ये भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील ५० विहिरींची पाहणी केली होती़ यात तालुक्यात तब्बल साडेतीन अर्थात ३़५२ मीटर भूजल खोल गेल्याचे स्पष्ट झाले होते़ यात आता २४ सेंटीमीटरची भर पडली असून तालुक्यातील सर्व १३ विहिरी ह्या १ मीटरपर्यंत खोल गेल्या आहेत़ नंदुरबार तालुक्यात पाच वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक ३़७८ मीटरने भूजल खोल गेले आहे़ या खालोखाल शहादा तालुक्यात गंभीर स्थिती असून येथील ९ विहिरींच्या निरीक्षणात ६३ सेंटीमीटरने पाणी खोल गेले आहे़ यामुळे तालुक्याची एकूण भूजल पातळी ही १़७३ मीटरने खोल गेली आहे़ जिल्ह्यातील सर्वाधिक सधन तळोदा तालुक्यातही स्थिती गंभीर असून येथे एकूण २़९४ मीटरने भूजल पातळी खोल गेल्याची माहिती नव्याने समोर आली आहे़ अक्कलकुवा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात १़४८ मीटर पातळी खालवली होती़ यात आणखी ४७ सेंटीमीटरची भर पडली आहे़ तर दुसरीकडे धडगाव तालुक्यात मात्र केवळ ७ सेंटीमीटरने पाणी खोल गेल्याची सुखद माहिती समोर आली आहे़ यात तालुक्यात १़१४ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट आल्याचे स्पष्ट झाले आहे़
पाच तालुक्यांची भूजल पातळी १ मीटरने खोलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 11:38 IST