रमाकांत पाटील ।नंदुरबार : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत व त्यांचे पुत्र भरत गावीत यांच्या पक्षावरील नाराजीचा वृत्तानंतर गेल्या २४ तासात जिल्हा आणि राज्यातील राजकारणातही सुरू झालेले घडामोडी शनिवारी अखेर थंडावल्या. गावीतांची पक्षश्रेष्ठींनी नाराजी दूर केल्याचे वृत्त कळताच भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील सोयीचे राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आशेवरही पाणी फिरले आहे.नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे या वेळी कुणाला उमेदवारी मिळेल हा सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय होता. निवडणुकीच्या चार महिन्यापूर्वी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांची बैठक नवापुरात झाली होती. त्यावेळी सर्व नेत्यांनी माणिकराव गावीत यांनीच पुन्हा उमेदवारी करावी, अशी गळ घातली होती. तथापि, वयोमानानुसार त्यावेळी गावीतांनी नकार देऊन पुत्र भरत गावीत यांच्याकडे इशारा केला होता. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीसमोर भूमिका मांडून त्यावेळी आमदार अॅड.के.सी. पाडवी व भरत गावीत या दोघांच्या नावाची शिफारस केली होती. मध्यंतरीच्या काळात अॅड.पाडवी यांचेच नाव आघाडीवर राहिले. तथापि, शेवटच्या टप्प्यात भरत गावीत यांच्या हालचाली वाढल्याने ते स्पर्धेत आले. तथापि, पक्षाने अधिकृतपणे अॅड.के.सी. पाडवी यांना उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यानंतर भरत गावीत व माणिकराव गावीत यांची नाराजी मात्र वाढली. उमेदवार जाहीर करताना आपण मतदारसंघातील ज्येष्ठ व अनुभवी लोकप्रतिनिधी असताना पक्षाने आपल्याला विश्वासात न घेतल्याची भूमिका माणिकराव गावीत यांनी व्यक्त केली. दुसरीकडे भरत गावीत यांनीही आपल्या समर्थकांचा स्वतंत्र मेळावा घेऊन भूमिका जाहीर करण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील राजकारण अधिकच ढवळून निघाले.या ढवळून निघालेल्या राजकारणात काँग्रेस आणि भाजपातील सोयीचे राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना चांगलेच फावले. त्यामुळे गेल्या २४ तासात जिल्ह्यापासून तर राज्याच्या राजकारणात हालचाल सुरू झाली होती. भरत गावीतांना थेट भाजपामध्ये प्रवेश देण्यासाठीही हालचाली सुरू झाल्या होत्या. या चर्चांमुळे भाजपामधील अंतर्गत नाराज गटही सक्रीय झाला होता. तर काँग्रेस पक्षातदेखील अंतर्गत घडामोडींना वेग आला होता. मध्यरात्रीपासून तर शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक चर्चांना ऊत आला.या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे शनिवारी मुंबई येथे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात माणिकराव गावीत व भरत गावीत यांना चर्चेसाठी बोलविले होते. मात्र तेथे नेते न भेटल्याने गावीत अधिकच नाराज झाल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर झळकले. त्यामुळे पुन्हा अंतर्गत राजकीय घडामोडींनी वेग घेतला. तथापि, काही वेळातच माणिकराव गावीत व भरत गावीत यांना पक्षश्रेष्ठींनी मुंबई येथील निवासस्थानी बोलवून त्यांच्याशी चर्चा केली व त्यांची नाराजी दूर केली. स्वत: भरत गावीत यांनी आपली नाराजी दूर झाल्याचे कळविले असून पक्षाचेच काम करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता सोयीच्या राजकारणाची स्वप्न रंगविणाऱ्यांचे स्वप्न भंगल्याचे चित्र असून २४ तासात जिल्ह्यातील राजकारण पूर्वीच्या ‘मोड’वर आले आहे.
काँग्रेस, भाजपातील नाराजांच्या आशेवर ‘पाणी’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:18 IST