लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील शोभानगर पुनर्वसन वसाहतीच्या शाळेतील शिक्षिका वैशाली केदार-पवार यांनी सामाजिक कार्यातून वेगळ्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी महोत्सव साजरा केला. आपल्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी संविधान दिनाचे औचित्य साधून त्यांनी शाळेतील १५० मुलांना सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या स्वेटर्सची भेट दिली.वैशाली भास्कर पवार ह्या जिल्हा परिषदेच्या शोभानगर, ता.शहादा येथे शिक्षिका म्हणून सेवारत आहेत. त्यांचे पती प्रदीप केदार हे म्युनिसिपल हायस्कूल शहादा येथे प्रयोगशाळा परिचर म्हणून सेवेत आहेत. त्यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस त्यांनी अनोख्या प्रकारे साजरा करण्याचे ठरवले. वैशाली पवार यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी स्वेटर देण्याचा मानस व्यक्त केला. प्रदीप केदार व वैशाली केदार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमास सरपंच खियालीबाई वसावे, पोलीस पाटील उंद्या वसावे, उपसरपंच केवल सिंग, बादल बसावे, ग्रा.पं. सदस्य कैलास वसावे, वीरसिंग वसावे, चौधरी वसावे, दिलीप वसावे व ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक कृष्णा चैत्राम खलाणे, जगन्नाथ पवार, भिमराव पावरा, बन्सीलाल सोनार, जयसिंग पावरा, रायमल पावरा यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. सूत्रसंचालन बन्सी सोनार तर आभार कृष्णा खलाणे यांनी मानले. वैशाली पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी राबविलेल्या या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य व उपस्थितांनी कौतुक केले.
स्वेटर्सच्या माध्यमातून शिक्षिकेने दिली मायेची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:53 IST