लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी शहादा शहर ३० जुलैपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांकडून या लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पाच दिवसांपासून शहरात सर्वत्र शुकशुकाट आहे. त्यामुळे कंटाळलेले शहरवासी व तरुण जवळील सातपुड्यातील पर्यटनस्थळी जाऊन आनंद लुटत आहेत.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील मोठ्या गावांमध्येही स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बाजारपेठाही बंद असल्याने शुकशुकाट आहे. म्हसावद येथे सोमवारी भरणारा आठवडे बाजारही ग्रामपंचायतीने निर्णय घेऊन स्थगित केला आहे. त्यामुळे म्हसावद येथेही शुकशुकाट आहे. शहादा शहरात लॉकडाऊनमुळे मुख्य रस्ते बॅरिकेट लावून बंद करण्यात आले आहेत. मात्र काही टवाळखोर युवक मोटारसायकलीवर फिरताना आढळून येतात. त्यांच्यावर पोलीस कारवाई करीत आहेत.सध्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये पाऊस झाल्याने सर्वत्र हिरवळ निर्माण झाली आहे. नदी-नाले दुथडी भरुन वाहत असल्याने निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सर्व व्यवहार व दुकाने बंद असल्याने कंटाळलेल्या काही हौशी तरुणांनी पर्यटन म्हणून सातपुड्यात जाणे पसंत केले. शहराजवळील उनपदेव येथील पर्यटनस्थळी काही युवक गेले होते. मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ग्रामस्थांनी हे पर्यटनस्थळ बंद केले आहे. तरीही काही युवकांनी तेथे जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रतिबंध करण्यात आला. काही युवकांनी वाकी नदीपात्रात मोटारसायकली धुवून घरी परतले तर काहींनी पुढे सातपुड्यातील टेकड्यांवर जाऊन पर्यटनाचा आनंद घेतला.कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून तालुक्यातील वीरपूर ग्रामपंचायतीने उनपदेव या पर्यटनास्थळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काटेरी झुडपे टाकून प्रवेशबंदी केली आहे. उनपदेव पर्यटनस्थळी असलेल्या गरम पाण्याच्या झºयात आंघोळीसाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सध्या पाऊस झाल्याने याठिकाणी असलेल्या वाकी नदीत पाण्याचा प्रवाह चांगला आहे. मात्र हे पर्यटनस्थळ बंद असताना काही युवकांनी तेथे जाण्याचा प्रयत्न केला. म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण पवार व पोलीस कर्मचाऱ्यांनी तेथे जाणाºया पर्यटकांना प्रतिबंध केला.
लॉकडाऊनला कंटाळलेल्यांची सातपुड्यात सैर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:56 IST