या पथकाने बिलाडी गावापासून शंभर मीटर अंतरावर शोधमोहीम सुरू असून केळीच्या शेतात बिबट्याचे पायाचे ठसे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. केळीच्या शेताच्या शेजारीच असलेल्या उसाच्या शेतात मादी बिबट्या व बछडे असल्याचा संशय पथकाला असून गुरगुरण्याचा आवाज उसाच्या शेतातून येत असल्याची माहिती वनपाल बी.एल. राजपूत यांनी दिली. शेतात राहणाऱ्या उसतोड कामगार, महिला व लहान मुलांनी गावातील सुरक्षितस्थळी आश्रय घेण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आली. या वेळी वनसंरक्षक डी.डी. पाटील, एस.जी. मुखाडे, बी.आर. शहा, के.एम. पावरा, एन.टी. थोरात आदींच्या पथकाने येथे भेट देऊन पाहणी केली. बिबट्यासह बछडे असल्यास त्यांना जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सतत बिबट्याच्या जोडीचा संचार प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या रब्बी हंगाम व ऊस तोडणीचे काम सुरू आहे. मात्र बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतीकामांवर विपरीत परिणाम झाला आहे.
शेतकऱ्यांनी बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी लेखी स्वरूपात पिंजरा लावण्यासंदर्भात मागणी केल्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
-बी.एल. राजपूत, वनपाल, वनविभाग शहादा.
माझ्यासह सहा जणांच्या शेळ्या बिबट्याने हल्ला करून ठार केल्या आहेत. त्यामुळे आमचे उदरनिर्वाहाचे साधनच गेले म्हणून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी.
-शिवदास सोनवणे, शेळी मालक, बिलाडी त.सा.
वनविभागाचे पथक गावात दाखल झाले असले तरी बिबट्याला पिंजरा लावून जेरबंद करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
-ईश्वर पाटील, पोलीस पाटील, बिलाडी त.सा.