रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गाव जेंव्हा जिद्दीला पेटून एकत्र येते आणि एखाद्या कामासाठी झोकून देते तेंव्हा काय चमत्कार होतो याचा प्रत्यय कोठलीखुर्द, ता.नंदुरबार या गावाला आला आहे. जलसंधारणाच्या कामासाठी या गावातील ग्रामस्थांनी तब्बल दोन महिने आपला घाम गाळून मातीत संस्कार केल्याने त्यातून तब्बल आठ कोटी रुपये पेक्षा अधीक खर्चाची कामे झाली आहेत. या कामाने दुष्काळाला आव्हान दिले आहे. कोठली हे नंदुरबारपासून दहा किलोमिटर अंतरावरील सुमारे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे समृद्ध असलेल्या या गावाला बकाल स्वरूप येत होते. त्याची वेळीच दखल घेवून गाव जागृत झाले. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावातील तरुण एकत्र आले. त्याला प्रशासनाने साथ दिली आणि पहाता पहाता गाव जिद्दीला पेटले. गावातील सुमारे 1200 लोकांनी तब्बल 50 दिवस रोज चार ते पाच तास श्रमदान केल्यामुळे गावात कंपार्टमेंट बडींग, मातीनाला बांध, सलग समपातळी चर, लूज बोल्डर स्ट्रर, सिमेंट नाला बांध, शेततळे, नाला खोलीकरण आदी विविध कामे झाली. ग्रामस्थांचा उत्साह पाहून जिल्हा परिषदेच्या अधिका:यांनी व इतर दात्यांनी डिङोलसाठी मदत दिली. त्यातून पोकलॅण्ड व जेसीबी द्वारेही कामे सुरू झाली. आणि दोन महिन्यात या गावाला चमत्कारीक स्वरूप आले. ग्रामस्थांनी श्रमदानातून साधारणत: 2705.868 घनमिटर कंपार्टमेंट बडींग, 75746.43 घटनमिटर नाला रुंदीकरण व खोलीकरण, सलग समपातळी चराचे 161.36 घनमिटर जलशोषक चर, 218.79 घटनमिर लूज बोल्डर स्ट्ररचे 25.9024 घनमिटर, विहिर पुनर्रभरणाचे 5600 घटनमिटर, सिमेंट नाला बांधचे 1968 घनमिटर, माती नाला बांधचे 3457.5 घनमिटर आणि शेततळ्याचे 48431.4 घनमिटर काम केले आहे. याशिवाय 746 शोषखड्डयांसह विविध कामे केली आहेत. गावातील वॉटर बजेट पहाता काम सुरू होण्यापूर्वी या गावात जेमतेम 207.76 कोटी लिटर पाणी उपलब्ध होते. वास्तवीक या गावाला वर्षाकाठी 19,716.19 कोटी लिटर पाण्याची गरज होती. परंतु पावसाचे पाणी वाहून जात असल्याने या गावाला 19, 508.426 कोटी लिटर पाण्याचा तुटवडा भासत होता. हा तुटवडा भरून काढण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेल्या कामांची उपयुक्तता वाढली आहे. या कामांमुळे 138315.986 कोटी लिटर पाणी अडणार असल्याने गावातून आता दुष्काळ हद्दपार होईल असा आत्मविश्वास ग्रामस्थांना आला आहे. त्यामुळे आता सर्वाना यंदाचा पावसाची प्रतिक्षा लागली आहे.
ग्रामस्थांचा घामाचा थेंबाला आले मोत्याचे मोल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 11:54 IST