बामखेडा व बिलाडी या दोन्ही गावांतील १९१ लोकांचे मंगळवारी प्रशासनाकडून स्वॅब घेण्यात आले होते. त्यात पुन्हा २१ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या रिपोर्ट प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन व महसूल प्रशासनासह ग्रामपंचायत विविध उपाययोजना राबवत ग्रामस्थांची संसर्ग साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी जनजागृतीसह विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, गावातच मोबाईल व्हॅन पाठवून स्वप घेण्याचे काम करून तत्पर आरोग्य सेवा देत असले तरी ते बामखेडासह बिलाडी गावांना चिंतेची बाब असल्याचे चित्र दिसत आहे.
शहादा तालुक्यातील बामखेडा त.सा, येथील ४० लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यापैकी दोन महिला या अगोदरच मयत झाल्या आहेत. ग्रामीण भागात रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून, ग्रामस्थांमध्ये आरोग्य प्रशासनाकडून व महसूल विभागाकडून जनजागृतीसह विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी ग्रामस्थांनीही सहकार्य करणे गरजेचे असल्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा यांनी केले आहे. आरोग्य प्रशासनाकडून घरोघरी जाऊन सूचना देण्यात येत आहे. विनाकारण गर्दी करू नये, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमात प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. तसेच तोंडावर मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करण्यासह सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा, डॉ. ज्योती सूर्यवंशी, आरोग्य सेविका डी.के. गिरासे, आशा सुपरवायझर सारिका बोरदे, आशा सेविका सुवर्णा इशी, मंडळाधिकारी जुबेर पठाण, तलाठी एम. बी. महाले, ग्रामसेवक हेमराज पाटील आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यू करावी
ग्रामपंचायतीकडून जंतुनाशक फवारणी करण्यात येत असली तरी ग्रामपंचायतीने सहा दिवस स्वयंस्फूर्तीने गाव बंद केल्यास संसर्ग साखळी तोडण्यासाठी मदत होणार आहे. मात्र स्थानिक प्रशासनाने संसर्ग साखळी तोडण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच होम क्वॉरंटाइन न राहता विलगीकरण कक्षात दाखल होण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य पथक व ग्रामपंचायत प्रशासनासह महसूल प्रशासन पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरण कक्षात घेऊन जात आहेत. यावेळी प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे व तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी ग्रामस्थांनी आरोग्य प्रशासनासह महसूल प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून साखळी तोडण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.