नंदुरबार : राज्याच्या विविध भागात लसीकरणाचा फज्जा उडाला असताना नंदुरबार जिल्ह्यात मात्र लोकसंख्येच्या ३.२५ टक्के नागरिकांना लस देण्यात आली आहे. असे असले तरीही वेग कमी असल्याने डिसेंबर २०२१ अखेरपर्यंतही जिल्ह्यात लसीकरण पूर्ण होणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील १४ लाख ५८ हजार ५५ नागरिकांना समोर ठेवत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू झाले होते. यातून प्रारंभी आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी पुढे येत होते. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्सला लस देणे सुरू झाले होते. मार्च महिन्यापासून ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यास प्रारंभ झाला होता. तर एप्रिलपासून १८ वर्षांवरील युवकांचे लसीकरण सुरू झाले होते. यातून जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ६२ हजार ६८६ डोस वितरीत करण्यात आले आहेत. आरोग्य व फ्रंटलाईन कर्मचारी जवळजवळ पूर्ण झाले असून ज्येष्ठांचे लसीकरण सध्या जोरात सुरू आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात ५५ केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून दर दिवशी शिबिरे घेऊन लसीकरण केले जात आहे.
१८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यावर नंदुरबार जिल्ह्यातून त्याला प्रतिसाद लाभला होता. यातून ८ लाख ३४ हजार ९०८ पैकी १४ हजार २८९ जणांनी विक्री वेळेत लस घेतली होती.
सुमारे १४ हजार जणांना पहिला डाेस वितरीत करण्यात आल्याने त्यांच्या दुसऱ्या डोसचे काय असा प्रश्न आहे.
जिल्ह्यासाठी सातत्याने लसींचा पुरवठा होत आहे. गेल्या महिन्यात सुमारे २५ हजार डोस प्राप्त झाले होते.
५ हजार डोसचे वितरण
जानेवारी ते एप्रिल या काळात संथ गती असलेल्या लसीकरणाने गती पकडली आहे. दरदिवशी किमान पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक डोसचे वितरण आरोग्य विभाग करत आहे.
जिल्हाधिकारी डाॅ. भारुड व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनात लसीकरण केंद्रांमध्ये वाढ केली आहे. ५५ केंद्रांवर लसीकरण होण्यासोबत दर दिवशी १०० पेक्षा अधिक कॅम्प घेण्यावर भर दिला जात आहे.
- डॉ. एन.डी. बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी.