दुर्गम भागात शिक्षक सुनील मावची, दीपक वसावे, सुरूपसिंग वसावे, गणेश पावरा, राजू वळवी यांनी परिसरात लसीकरण व लस संबंधित वेगवेगळ्या अफवा, भीती, गैरसमज पसरलेल्या असताना जनप्रबोधन व जनजागृती चालूच ठेवली होती. या जनजागृतीला प्रत्यक्ष लसीकरण शिबिरामुळे यश मिळाल्याचे समाधान मिळाले. वालंबा केंद्रातील जि. प. शाळा उमरपाडा येथे लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तहसीलदार रामजी राठोड, गटशिक्षणाधिकारी आर. आर. देसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोठारी, केंद्रप्रमुख कांतीलाल पाडवी, सरपंच धनसिंग वसावे, मानव संसाधन विकास जनसंपर्क अधिकारी नरेश वसावे, मुख्याध्यापक सुनील मावची, पोलीस पाटील, होराफळीचे उपसरपंच, वालंबाचे मुख्याध्यापक ठाकरे, केंद्रातील शिक्षक, लसीकरण टीममधील कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तहसीलदार राठोड, डॉ. कोठारी, सरपंच धनसिंग वसावे यांनी लसीकरणचे महत्त्व, फायदे व आवश्यकता याविषयी माहिती दिली. केंद्रप्रमुख पाडवी यांनी स्थानिक बोलीभाषेतून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. सरपंच धनसिंग वसावे यांनी प्रथम लस घेऊन सुरुवात झाली.
लसीकरण शिबिराचे औचित्य साधत तहसीलदारांनी मोफत धान्य वाटप योजनेंतर्गत लाभार्थींना गहू, तांदूळ व धान्यादी माल देयकाप्रमाणे वाटप करण्यात आले. लसीकरण शिबिराचा परिणाम म्हणून परिसरातील १८ वर्षे वयातील तरुणही शिबिरात उपस्थित झाले व आम्हालाही लस द्या, अशी विनंती करू लागले. यावर तहसीलदारांनी लवकरच उपलब्ध केली जाईल, याची ग्वाही दिली. लस व लसीकरणाविषयीच्या अनंत अडचणी, अफवा, भीती, गैरसमज याला न जुमानता लोकांनी लसीकरणासाठी सहभाग नोंदवला.