तळोदा नगरपालिका, आरोग्य विभाग व शहरांतील मुस्लिम बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने जामा मशीद परिसरात लसीकरण शिबिराचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष अजय परदेशी, तहसीलदार गिरीश वखारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक विजय पाटील, गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, पालिका प्रशासकीय अधिकारी राजेंद्र माळी, मुस्लिम धर्माचे धर्मगुरू मौलाना शोएब रजा नुरी, ज्येष्ठ पत्रकार अक्रम पिंजारी, डॉ. पिंजारी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी सांगितले की, मुस्लिम समाजाने लसीकरणासाठी घेतलेला पुढाकार हा उल्लेखनीय आहे. लसीकरणाबाबतचे समाजात असलेले गैरसमज सोडून प्रत्येकाने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
तहसीलदार वखारे यांनी, अनलॉक प्रक्रियेकडे जिल्हा वळत आहे; मात्र यापुढे काळी बुरशी व संभाव्य तिसरी लाट असे दुहेरी संकट उभे आहे. सर्वांवर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण केवळ हाच एकमेव पर्याय आहे. बालकांसाठी लसीकरणाबाबत संशोधन अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.
माैला शोएब रझा नुरी यांनी सांगितले की, लसीकरणाबाबत गैरसमज आहेत, अफवा पसरविल्या जात आहेत, मात्र तसे अजिबात नसून लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनामुक्तीसाठी लसीकरण केवळ हाच एकमेव पर्याय आहे. लस नाही घेतली, तर हजला जाणेसुद्धा शक्य नाही. त्यामुळे लसीकरण करून घेऊन धर्म पाळणे गरजेचे आहे. ४५ वर्षावरील महिला, पुरुष सर्वांनीच लसीकरण करून घेण्याचे आवाहन मौलाना शोएब रजा नुरी यांनी केले. सूत्रसंचालन मुस्लिम पंच जमातीचे सचिव याकूब पिंजारी यांनी केले.