नंदुरबार : जुन्या वाहनांना भंगारात काढण्याची पाॅलिसी येत्या काही दिवसात अमलात येणार आहे. या नवीन पाॅलिसीनुसार दरवर्षी जुन्या वाहनांचे फिटनेस तपासणी करूनच ते रस्त्यावर आणावे लागणार आहे. वाहनधारकांनी फिटनेस प्रमाणपत्र न घेतल्यास त्यांच्यावर कारवाईही होणार असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात १५ वर्ष जुन्या चारचाकी वाहनांची संख्या ही कमी असली तरी १५ वर्ष जुन्या दुचाकींची संख्या ही मोठी आहे. २००२ पासून जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु झाल्यापासून नोंदणी केलेल्या वाहनांना १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडून ग्रीन टॅक्स वसूली करण्यात येत आहे. यापूर्वी दर पाच वर्षांनी होणारे फिटनेस प्रमाणपत्र आता वर्षाने करावे लागणार आहे. ज्या वाहनांना १५ वर्ष पूर्ण होतील त्यांना हे प्रमाणपत्र आरटीओ कडून घ्यावे लागणार आहे. यासाठी नागरिकांच्या आरटीओच्या चकरा मात्र वाढणार आहेत.