कोरोनाचा संसर्ग वाढल्याने एसटीचे चाक थांबले होते. जून महिन्यात एसटी काहीअंशी पूर्ववत सुरू करण्यात आली, परंतु प्रवाशांनी पाठ दाखवल्याने दर दिवशीच्या खर्चाचा प्रश्न समोर होता. यातून ऑगस्ट महिन्यापासून काही बसेसला गर्दी वाढू लागल्याने एसटीला पूर्ववत लाभ होत होता. यामुळे नंदुरबार आगाराने बंद केलेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. तूर्तास आंतरजिल्हा, जिल्हाबाह्य व परराज्यात एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. नंदुरबार आगारातून दिवसभरात ४५४ फेऱ्या सध्या पूर्ण करण्यात येत असून या माध्यमातून १० लाख रुपयांचे उत्पन्न आगाराला प्राप्त होत आहे. दीर्घ कालावधीनंतर आता शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी नंदुरबारकडे वळणार आहेत. यातून पासधारकांची संख्या वाढून दैनंदिन उत्पन्नात दीड ते दोन लाख रुपयांची वाढ होणार आहे. अहिल्याबाई होळकर मुलीना मोफत बसप्रवास योजना अंतर्गत आतापर्यत ७०० मुलींना बस पासेस देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ८०० बस पासेस वाटप करण्यात आली आहे.
१० लाख कमाई
नंदुरबार आगारातून दररोज ३६ हजार ७६० किलोमीटरचा प्रवास होत आहे. यापूर्वी या बसेस ४० हजार किलोमीटर प्रवास करून ९ लाख ५० हजार रुपयांची कमाई करत होत्या. परंतु आता ३६ हजार किलोमीटर अंतरात तब्बल १० लाख रुपयांची कमाई करत असल्याचे दिसून आले आहे. यातून एसटीच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. लाॅकडाऊन काळात हीच कमाई हजारांच्या घरात गेली होती. एसटीने पुन्हा भरारी धेतल्याने कर्मचारी सुखावले आहेत.
सर्वच मार्ग सुरू
प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्हांतर्गत वाहतूकही वेगात सुरु आहे. यांतर्गत सध्या तळोदा २२, अक्कलकुवा ८, धडगाव १०, गुजरात राज्यातील सुरत येथे १०, अंकलेश्वर येथे चार बसेस धावत आहेत. आगारातून वैंदाणे, खोलघर, वसलाई, अलियाबाद, पिपंळनेर, साक्री, दोंडाईचा, सेजवा, हाटमोहिदा, पाचमाैली, बलदाणे, बोराळा आणि वडझाकण या १६ ठिकाणी मुक्कामी बसेस सुरु आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी लॉक डाऊन च्या आधीच्या सर्व बसफेऱ्या पूर्वपदावर करण्यात आल्या आहेत. मानव विकास बससेवा लवकर सुरू करण्यात येेणार आहे. प्रवाशांनी जीव धोक्यात घालून प्रवास न करता बसने सुरक्षित प्रवास करावे. नंदुरबार आगारातून नियमित बसेस सोडत प्रवाशांची सोय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लांब पल्ल्याच्या बसेसही सुरू करण्यात आल्या आहेत.
-मनोज पवार,
आगारप्रमुख,
ग्रामीण भागातून इतर ठिकाणी जाण्यासाठी एसटी हे सुरक्षित व सोयीचे वाहन आहे. एसटी पुन्हा सुरू झाल्याने समाधान आहे. ग्रामीण भागात एसटीमुळे वाहतुकीच्या अडचणी दूर होतात.
-मनोहर नांद्रे,प्रवासी,
गुजरात राज्यातून नातेवाइकांचे कायम येणे-जाणे असते. सुरत येथे आमचेही जाणे होते. बसेस सुरू झाल्याने तेथील नातलगांसोबत संपर्क होत आहे. रेल्वे बंद असल्याने एसटी सोयीची आहे.
-राकेश माळी, नंदुरबार,