नंदुरबार : शहरालगतच्या वाघोदा, पातोंडा, होळ तर्फे हवेली तसेच दुधाळे शिवारातील रहिवासी वसाहतींमध्ये चोऱ्यांचे प्रकार सुरू झाले आहेत. यातून नागरिकांमध्ये भीती आहे. रात्रीच्या वेळी चोरटे या भागामध्ये फिरत असल्याची माहिती सातत्याने समोर आली आहे. याकडे पोलीस ठाण्यांनी लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी आहे. पोलिसांकडून रात्रीच्या वेळी गस्त घातली जात असली तरी काही भागात गस्त होत नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे या भागात गस्त सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रकाशा पुलापर्यंतचे खड्डे त्रासदायक
नंदुरबार : तालुक्यातील कोरीट फाटा ते प्रकाशा येथील तापी पुलापर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे. मार्गाचे काँक्रिटीकरण अद्यापही सुरू झालेले नसल्याने जुन्या रस्त्याची डागडुजी करण्यासही संबंधित विभाग धजावत नसल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. दरम्यान प्रकाशा पुलावर प्रवेश करताना पुलाच्या दोन बाजूस भराव नसल्याने वाहन थेट पुलाखाली जाण्याची भीती आहे. हा भराव वाढविण्याचीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
हाट दरवाजा मार्गाने मिनी बस सुरू करावी
नंदुरबार : तळोदा ते नंदुरबारदरम्यान धावणाऱ्या मिनी बसेस हाट दरवाजा मार्गाने सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तळोदा ते नंदुरबार मार्गावर रहिवासी वसाहती वाढल्या आहेत. येथून शहरात येणाऱ्या नागरिकांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. बसेस हाट दरवाजा मार्गाने सुरू झाल्यास प्रवाशांची अडचण दूर होणार आहे. एसटी महामंडळाने याकडे लक्ष देण्याची अपेक्षा आहे.
नागरिक त्रस्त
नंदुरबार : शहादा रोड परिसरातील रहिवासी वसाहतींमध्ये मोकाट श्वानांमुळे नागरिक त्रस्त आहेत. श्वानांच्या झुंडी या भागात फिरत असून, त्यांच्यामुळे नागरिकांमध्ये भीती व्यक्त करण्यात येत आहे.