लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पावसाची चिन्हे नसतांना अचानक आलेल्या मुसळधाव पावसाने शहरवासीयांची एकच दाणादाण उडविली. शिवण आणि पाताळगंगा नदींना पूर आला. दरम्यान, शिवण नदीच्यात पुरात अडकलेल्या दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. या पावामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली, काही भागात पाणी साचले. साधारणत: एक तास ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या चमचमाटात हा पाऊस सुरू होता.गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. भाद्रपद हिट देखील जाणवत आहे. त्यामुळे तापमान ३५ ते ३६ अंशापर्यंत जात आहे. उकाडाही असह्य होत आहे. बुधवारी देखील सकाळपासूनच ऊन पडले होते. आकाश निरभ्र होते. पावसाचे कुठलेही चिन्ह नसतांना दुपारी साडेबारा वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तासभर मुसळधार पाऊस सुरू होता. नंदुरबार शहरासह परिसरात झालेल्या पावसाने शिवण व पाताळगंगा नदीला पूर आला.दोन जण पुरात अडकलेशिवण नदीला देखील अचानक पूर आला. दुपारी खामगाव शिवारातील जुन्या पुलाच्या ठिकाणी दोन युवक आपला टेम्पो घेऊन त्या ठिकाणी धुण्यासाठी गेले होते. नदीला पाणी कमी असल्याने त्यांनी मध्यभागी टेम्पो नेऊन धूत असतांना दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास अचानक नदीला पूर आला. या पुरामुळे दोन्ही युवक घाबरले. जुन्या पुलाच्या पडक्या पिलरवर चढून त्यांनी आपला जीव वाचवला. सुदैवाने टेम्पो पिलरच्या अडोशाला लावलेला होता. त्यामुळे तो वाचला. परंतु पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे टेम्पोचे नुकसान झाले.प्रशासन धावलेनदीच्या पुरात दोनजण अडकल्याची माहिती प्रशासनाला कळाली. तातडीने शहर पोलीस ठाणे, नगरपालिका अग्निशमन दलाचे जवान आणि महसूलचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. दोन्ही युवकांना सुखरूपपणे बाहेर काढले. पाणी ओसरल्यावर टेम्पो देखील बाहेर काढण्यात आला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे या युवकांच्या जीवदानावरून दिसून आले.पाताळगंगा नदीलाही पूरया पावसामुळे पाताळगंगा नदीला देखील पूर आला आहे. यामुळे नंदुरबारातील ब्रिटीशकालीन बंधारा देखील ओव्हरफ्लो झाला होता. या बंधाऱ्यावरून सायंकाळपर्यंत पाणी वाहत होते.गल्लीला आले नदीचे स्वरूपशहरातील गवळीवाडा, भोई गल्ली ते मंगळबाजार या दरम्यानच्या रस्त्याला आणि गल्लीला नदीचे स्वरूप आले होते. गुढघ्याभर पाणी या भागातून वाहत होते. त्यामुळे यार्दीच्या राम मंदीराजवळील रस्त्यावर अनेकजण घसरून पडत होते. दुचाकीस्वारांचे मोठे हाल होत होते. वाहने बंद पडण्याचे प्रकार देखील या भागात होत होते.
शिवण नदीच्या पुरात अडकलेल्या दोघांना काढले सुखरूप बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:14 IST