लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अंगणात लावलेली झाडे तोडण्याच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत दोनजण जखमी झाल्याची घटना 6 रोजी खडकी, ता.नवापूर येथे घडली. परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खडकी येथील गणेश विनायक गावीत यांनी त्यांच्या अंगणात झाडे लावली होती. ती भगतसिंग आगेसिंग गावीत यांनी तोडल्याच्या कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. दगड व हाताबुक्यांनी मारहाण केल्याची फिर्याद गणेश गावीत यांनी दिली. त्यावरून भगतसिंग आगेसिंग गावीत, कपिलाबाई भगतसिंग गावीत, राजन भगतसिंग गावीत, हर्षल भगतसिंग गावीत, अश्विन भगतसिंग गावीत, सुनील रुबा गावीत, दिपक रुबा गावीत, बुलकीबाई रुबा गावीत, निर्मलाबाई सुधीर गावीत सर्व रा.वडसत्रा, ता.नवापूर यांच्याविरुद्ध दंगलीचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद भगतसिंग आकेसिंग गावीत यांनी दिली. झाड तोडल्याचा राग येवून जमावाने मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून विनायक सुपडय़ा गावीत, गणेश विनायक गावीत, विलकीबाई विनायक गावीत, निर्मलाबाई गणेश गावीत व शेवंतीबाई सुपडय़ा गावीत यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक वळवी करीत आहे.
झाड तोडण्याच्या वादातून दोन गटात मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:09 IST