रजाळे या गावाहून नंदुरबार दोंडाईचा, अशी वाहतूक होत असल्याने या रस्त्यावरून दिवसाला हजारो वाहनांची ये-जा असते. गावापासून हाकेच्या अंतरावरच हे झाड अनेक दिवसांपासून जैसे थे स्थितीत पडून आहे. तसेच रस्त्याच्या आजूबाजूला काटेरी झुडपांचा ही विळखा वाढला असून, समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. संबंधित विभाग कुंभकर्णी झोपेत गेला की काय? असा देखील प्रश्न आता जनमानसात उपस्थित करण्यात येत आहे. हे झाड पडल्याने याठिकाणी केवळ दुचाकी निघेल इतका रस्ता असल्याने अवजड वाहनांना मोठी कसरत करून वाहन काढावे लागत आहे. अनेकदा या ठिकाणी वाहतूक देखील ठप्प होत असून, वाहनधारकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय. अनेकदा वाहनधारक रात्रीच्या सुमारास प्रवास करीत असून, या ठिकाणी हे उन्मळलेले झाड नजरेत येत नसल्याने वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. उन्मळलेले झाड त्वरित काढण्यात यावे, अशी मागणी आता प्रवासी व ग्रामस्थांमध्ये जोर धरू लागली आहे. अन्यथा त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दिनेश फकिरा पाटील यांनी दिला आहे.
रजाळे रस्त्यावर १५ दिवसांपासून झाड पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST